Saturday, January 31, 2026

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यावर उपस्थित सर्व आमदारांनी समर्थन दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार त्यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत. खासदारकीचा दिला राजीनामा

गटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >