मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. आज दुपारी २ वाजता विधिमंडळात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. या निवडीवेळी पक्षाच्या सर्व आमदारांनी आपली एकजूट दाखवून दिली. या नियुक्तीनंतर लगेचच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. केंद्रातील राजकारण सोडून आता त्या पूर्णपणे राज्याच्या राजकारणात स्थिरावणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी दिमाखात पार पडणार असून, अजित दादांनंतर राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा वहिनींच्या समर्थ खांद्यावर आली आहे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या काही ...
सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. या मोठ्या जबाबदारीपूर्वी त्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आपल्या राज्यसभा खासदारकीचा अधिकृत राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून थोडक्यात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलली. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी आणि विधानसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती, त्यानुसार त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. अजित दादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिल्लीचे राजकारण सोडून आता थेट मुंबईत राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
आता सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या पत्रासह नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
आज पार पडलेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अत्यंत भावूक वातावरणात सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीचे अधिकृत पत्र आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजित दादांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी तातडीने अनुमोदन दिले. उपस्थित सर्व ४० हून अधिक आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिल्याने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच अत्यंत महत्त्वाचे असलेले अर्थ मंत्रालय (वित्त खाते) होते. आता सुनेत्रा पवार हे खाते स्वतःकडेच ठेवणार की अनुभवी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या शपथविधीनंतर या खात्यांच्या वाटपाचा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.






