Saturday, January 31, 2026

Sunetra Pawar Oath : म्हणून सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Sunetra Pawar Oath : म्हणून सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला; जाणून घ्या नेमकं काय घडलं
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली गेली आहे. आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. आज विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत होणाऱ्या महत्वाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
मात्र शपथविधीची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित होत असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून याचं उत्तर समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गट नेते निवड आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोअर टीमचाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाची चर्चा मुद्दाम काही जण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका एनसीपी कोअर टीमने घेतली. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करणे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनीव तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (३० जानेवरी) सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.
त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे : शरद पवार  दरम्यान शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; "सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला. त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे."  शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >