सुनेत्रा पर्वाचे संकेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा राजकीय वारसा, पक्षाचे भवितव्य आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यावर महाराष्ट्राचा कानाकोपरा खऱ्या अर्थांने शोकाकुल झाल्याचे मागील तीन दिवसांत पाहावयास मिळाले. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांची, राष्ट्रवादी पक्षाची, बारामतीकरांची जितकी हानी झाली, त्याहून अधिक हानी अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची व महाराष्ट्रातील जनतेची झाली आहे. स्पष्टवक्तेपणा, रोखठोक विचार मांडणारा एक राजकारणी महाराष्ट्राने गमविला. मराठीतील नावाजलेले कवी भा. रा. तांबे यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेच आहे की, रामकृष्णही आले-गेले, त्याविण जग का ओसचि पडले. काळ हा सुरूच राहतो, वेळ कधीही, कोणासाठी थांबत नाही. अजित पवारांच्या अकाली जाण्याने पार्थ, जय व सुनेत्रा पवार तसेच अन्य पवार कुटुंबीयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. संघटना पोरकी झाली आहे. संघटना अधिक काळ निर्णायकी ठेवून चालत नाही. दु:ख बाजूला ठेवून निर्णय घ्यावेच लागतात. मासा पाण्यात रडतो, त्याचे अश्रू कधीही कोणाला दिसत नाहीत. तशीच अवस्था आज अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांची व मंत्र्यांची झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे तब्बल ६ वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. राज्याचा ११ वेळा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. राज्याला नव्याने अर्थमंत्री शोधावा लागणार आहे. राज्याला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तर राष्ट्रवादी पक्षाला संघटना सांभाळणारे नेतृत्व हवे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीय शोकाकुल असले तरी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुखपद रिक्त ठेवणे परवडणारे नसल्याने राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेतेमंडळींनी धावपळ सुरू केली आहे आणि ते करणे गरजेचे होते. अजित पवारांची व शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सुरू आहे. अजित पवारांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि शरद पवारांनीही त्यास संमती दिली होती. विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची घटिका समीप आली आणि काळाने अजितदादांवर झडप घालून त्यांना हिरावून नेले. अजितदादांचे वारस म्हणून त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी आणि पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवावे, असा सूर आता राष्ट्रवादीच्या खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलेल्या अजित पवारांनी काही कारणास्तव काकांपासून वेगळे होत आपली स्वतंत्र राजकीय चूल मांडली होती. अजित पवारांच्या पाठीशी स्वतंत्र जनाधार असल्याने विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले हाेते. अजित पवारांच्या तसेच शरद पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीमधील प्रत्येकाचीच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, काका-पुतणे पुन्हा एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्रित दिसावेत अशी महाराष्ट्रीय जनतेचीही इच्छा आहे.


सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय व्यासपीठावर सक्रिय झाल्या असल्या तरी गेली अनेक दशके त्यांनी अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात पडद्याआडून साथ दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात पराभूत झाल्यावर अजित पवारांनी त्यांना राज्यसभेवर खासदार बनविले. एप्रिल २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून पार्थ पवार निवडणूक लढवित असताना सुनेत्रा पवारांनी पडद्याआडून बऱ्यापैकी धुरा सांभाळल्याचे राष्ट्रवादीमधील घटकांकडून सांगण्यात येत आहे. अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमातून भाषण करताना अनेकदा सुनेत्रा पवारांचे आभारही मानले. सुनेत्रा पवारांनी घर सांभाळल्याने मला महाराष्ट्र सांभाळता आला असल्याचे, राजकारणासाठी तसेच लोकांसाठी वेळ देता आला असल्याचे सांगत त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली होती. बारामतीमधील अनेक कार्यक्रमांमध्ये अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारांची उपस्थिती असायची. अजित पवारांनी स्वत:ची स्वतंत्र राजकीय चूल मांडल्यावर सुनेत्रा पवार यांचा राजकीय ठिकाणी वावर वाढण्यास सुरुवात झाली. आज अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी संघटना, सरकारमधील अजित पवारांचे सहकारी या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या परिवारावर आलेली आहे. नजीकच्या काळात राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आदी मंडळी मदतीला येतीलच. अजित पवारांच्या जाण्याने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवारांनी बसावे अशी इच्छा राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, अनेक आमदारांकडूनही तशी भावना उघडपणे व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांचा दु:खवटा सुरू असल्याने राष्ट्रवादीमधील घटकांनी याबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्याशी चर्चा केली नसली तरी लवकरच ते चर्चा करतील व निर्णय घेतील. अजित पवारांच्या जाण्याने दु:ख भरून येणार नसले तरी राष्ट्रवादी संघटनेसाठी, आमदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी त्यांना डोळ्यांतील अश्रू पुसून लवकरात लवकर सक्रिय व्हावे लागणार आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नीलेश लंके आदी अनेक मंडळी सुनेत्रा पवारांच्या मदतीला असणारच. पार्थ पवार, जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करावाच लागणार आहे. अडचणीच्या काळात अजितदादांचा परिवार स्वत:चे आभाळाएवढे दु:ख बाजूला सारुन पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी सक्रिय झाला आहे, हे चित्र लवकरात लवकर निर्माण होणे राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शोकाकुल जनतेचीही ती इच्छा आहे. त्यामुळे लवकरच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होवून अजित पवारांनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडून यावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावर सुनेत्रा पर्वाचा शुभारंभ झाल्याचे पहावयास मिळणार आहे.

Comments
Add Comment

केंद्र सरकारवर खापर का?

यूजीसी कायदा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच लागू केला असला तरी आंदोलनकर्त्यांनी रोष केंद्र सरकारवर ठेवला

शब्दाला जागणारा नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत राहिले. लोकसभेची अल्पकालीन कारकीर्द

नाशिकच्या विकासाशी नाळ जुळलेला नेता

नाशिक जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर १ राहण्यामागे देखील अजित दादा पवार यांचे

दादा माणूस!

'ते' अजातशत्रू अजिबात नव्हते. तसं होण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. कोणीही त्यांचा कधी द्वेष केला

घातक पाणी

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे. जलवाहिन्यांमार्फत दूषित पाण्याचा पुरवठा आणि त्यामुळे

हे किळसवाणे कोठून येते?

विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. बेकायदेशीर शाळेच्या महिला सहाय्यक नसलेल्या व्हॅनमध्ये