Saturday, January 31, 2026

ठाण्यात शिवसेना-भाजपची बिनविरोध सत्तास्थापना

ठाण्यात शिवसेना-भाजपची बिनविरोध सत्तास्थापना

महापौर आणि उपमहापौर दोघांचीही बिनविरोध निवड

ठाणे : महापालिकेच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर दोन वर्षांसाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महापौर पदासाठी शिवसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सव्वा वर्ष असणार महापौर आणि उपमहापौर पद

महापौर आणि उपमहापौरपदाचा फाॅर्म्युला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिवसेनेचा महापौर विराजमान होणार आहे. तसेच भाजपकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षँसाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौर पद ही बदलले जाणार आहे. त्या ठिकाणी दुसरा चेहरा दिला जाणार आहे. असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. महापौर पद शिवसेनेकडेच आणि उपमहापौर पद हे भाजपकडेच राहणार आहे.

Comments
Add Comment