Saturday, January 31, 2026

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवारी, ता. ३०) खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून, सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता सत्तेच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे. परंतु, अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार कुटुंबियांची सून, ही ओळख वगळता सुनेत्रा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे, ते जाणून घेऊयात...

सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण असून, त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय सुनेत्रा पवार यांना जाते. पहाटेपासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करत त्यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडीने ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे त्यांना सार्क देशांच्या 'साकोसान' परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल व्यापक पातळीवर घेतली गेली.

बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध उपक्रम त्यांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय व नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

लग्नानंतर शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळणे आणि दूध काढणे अशी कामे त्यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, नातेसंबंध जपणे, सामाजिक कार्य करणे तसेच कठीण प्रसंगी त्यांना साथ व सल्ला देणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत सक्रिय प्रचार करत असत आणि बारामतीतील अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत आणि जनसेवेत सक्रिय राहिल्या.

यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांच्याकडे तालिका सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या आसनावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >