ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअभावी ही कुटुंबे सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडे घातले. याबाबत महसूलमंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचे संजय केळकर म्हणाले.
सुमारे ६५ वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले आहे. मात्र या कुटुंबांच्या तीन पिढ्या सोयी सुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव चार एकरवर असून आणखी तीन एकर जमीन गावाला मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांत तीन पिढ्यांचे जीवनमान ढासळले आहे. जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी संजय केळकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत आ.केळकर यांनी लवकरच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत संजय केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी ठाण्यासह इतर तालुक्यांतील नागरिकही समस्यांची निवेदने घेऊन आले होते. यात बाळकुम येथील दोस्ती गृहसंकुल परिसरात वाढत्या अपघातांमुळे गतिरोधकाची मागणी, ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या, मॉडेला चेक नाका येथील कामगार कार्यालय, बेथनी रुग्णालयात रुग्णाचे बिल कमी करणे, शर्मिला सोसायटी, शिधावाटप कार्यालय, सन मोटर्स यांनी केलेली फसवणूक, विकासकाकडून झालेली फसवणूक आदी समस्यांची निवेदने प्राप्त झाली. संजय केळकर यांनी काही प्रकरणात तत्काळ संबंधितांना फोन करून त्यावर निर्णय घेतले तर काही प्रकरणांचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात अनिल भगत, राजेश गाडे, दिपक गायकवाड, विशाल वाघ, राजेश जाधव, राजेश ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






