Saturday, January 31, 2026

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे तीन महत्त्वाच्या खात्यांची धुरा; अर्थ आणि नियोजन कुणाकडे ?

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे तीन महत्त्वाच्या खात्यांची धुरा; अर्थ आणि नियोजन कुणाकडे ?

मुंबई : उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या नव्या खातेवाटपात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ या तीन महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेले अत्यंत कळीचे 'अर्थ व नियोजन' खातं राष्ट्रवादीकडून निसटले असून ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडेच राहणार आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी होताना अर्थ खात्यासाठी अत्यंत आग्रही होते, त्यामुळेच ते राष्ट्रवादीला मिळाले होते. मात्र, आता हे खाते मुख्यमंत्र्यांकडे गेल्याने यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या सत्तेत भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा दिसून आला असून, राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक वजनदार खाते कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उर्वरित खात्यांमध्ये शिवसेनेकडे नगरविकास, तर भाजपकडे महसूल आणि गृह ही महत्त्वाची खाती कायम आहेत.

सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची धुरा, पण 'तिजोरी'ची चावी...

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित दादांकडे असलेले महत्त्वाचे 'अर्थ व नियोजन' खाते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे राज्याचा २०२६-२७ चा आगामी अर्थसंकल्प मांडण्याचा मान फडणवीसांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडे असलेली अर्थ खात्याची पकड आता मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतरित झाली आहे. शपथविधीचा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे कुटुंबावर आणि राज्यावर असलेल्या शोककळेमुळे, त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताही उत्सव न करण्याचे आवाहन केले आहे. अजित दादांच्या दहाव्याच्या विधीपर्यंत त्या बारामतीतच राहून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे हार किंवा बुके स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >