देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की बंद याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र रविवार असूनही बजेट सदरीकरणाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात दुसऱ्यांदाच रविवारच्या दिवशी शेअर मार्केट सुरू असणार आहे.
रविवारी शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार समित्यांकडून घेण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर मार्केटचे व्यवहार हे बंद असतात. मात्र मागच्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होतं. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा शनिवार असूनही शेअर बाजारातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही रविवार असूनदेखील शेअर मार्केट सुरू राहणार असल्याचे दोन्ही बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.
यामुळे उद्या बजेटच्या दिवशी रविवार असूनही ट्रेडिंग करता येणार आहे. नेहमीच्या बाजार वेळेनुसार म्हणजेच ९:१५ ते ३:३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.






