Monday, February 2, 2026

उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा; अर्थसंकल्प कोणी मांडायचा हे चर्चेतून ठरवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा; अर्थसंकल्प कोणी मांडायचा हे चर्चेतून ठरवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप आणि राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे. उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार असून, त्यात गटनेत्याची निवड केली जाणार आहे. तसेच अजित पवार यांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस जे काही निर्णय घेईल, त्याला भाजप पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. राष्ट्रवादीचे नेते दोन वेळा माझ्याशी चर्चा करून गेले असून, या चर्चेत त्यांनी पक्षाची कार्यपद्धती, उपलब्ध पर्याय आणि पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली आहे. मात्र अंतिम निर्णय हा संबंधित पक्षाचाच असतो, त्यामुळे त्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प कोण सादर करणार?
राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः यात लक्ष घालून अर्थसंकल्पाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोणी सादर करायचा, याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या महापौर पदाबाबत दोन दिवसांत निर्णय  महापौर पदाच्या निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीतील संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई तसेच इतर शहरांतील महापौर पदासाठी जी नावे पुढे आली आहेत, त्यावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा केली जाईल. त्यानंतर अंतिम नावे निश्चित केली जातील. संबंधित महानगरांचे अध्यक्ष आणि आमदार योग्य तो निर्णय घेतील. नागपूरच्या महापौर पदासंदर्भातही एकूण चर्चा झाली असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा