प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधा
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबई कोस्टल रोडवर सहा ठिकाणी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अत्याधुनिक प्रकारच्या जैव विघटनक्षम शौचालयांची म्हणजेच बायो-टॉयलेट्स उभारणी करण्यात आली आहे. कोस्टल रोडवरील विहार क्षेत्रावर पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, ४, ६, ११, १२ आणि १४ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मुंबईच्या सुलभ वाहतुकीच्या बाबतीत धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा अभियांत्रिकी आविष्काराचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. या मार्गावर ठिकठिकाणी विहार क्षेत्र अर्थात प्रोमेनाड निर्माण करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी उभारलेल्या या विहारक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. त्यांच्यासाठी स्वच्छताविषयक उत्तम सुविधा देण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जैव विघटनक्षम शौचालये (बायो-टॉयलेट्स) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, अमरसन्स उद्यानाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ४, आकृती इमारत वाहनतळाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ६, हाजी अली जंक्शन; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ११, वरळी दुग्धशाळेसमोर; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १२, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १४, खान अब्दुल गफार खान मार्गावर बिंदूमाधव ठाकरे चौकाच्या उत्तर दिशेला; अशा एकूण सहा ठिकाणी या सुविधा आहेत.
या अत्याधुनिक मॉड्युलर जैव विघटनक्षम शौचालयाचा आकार २० बाय २० बाय ८ फूट असून १ केडब्ल्यू सौरऊर्जा प्रणालीवर कार्यरत राहील. यामध्ये महिलांसाठी २ ज्यामध्ये १ पाश्चिमात्य आणि १ भारतीय शैलीचे, तर पुरुषांसाठी २, बालकांसाठी १ आणि दिव्यांगांसाठी १ पाश्चिमात्य शैलीचे शौचालय आहे. तर, ६ युरिनल, ३ वॉशबेसिन, ३ सेन्सर आधारित आरसे, ३ साबण डिस्पेन्सर, १ सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, १ सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, १ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, ३ हजार लीटर क्षमतेचे १ डीआरडीओ बायो-डायजेस्टर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.
योग्य कचरा व्यवस्थापन करणे व वीज वापर मर्यादित ठेवण्यासाठी या अत्याधुनिक मॉड्युलर शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. सहा ठिकाणी शौचालयांचे एसआयटीसी काम पूर्ण झाले आहे. ही स्वच्छतागृहे सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असून सागरी मार्ग परिसराच्या सुशोभीकरणात भर घालणारी आहेत. या सुविधेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नीटनेटकी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे तसेच, नाममात्र वापर शुल्काच्या माध्यमातून आर्थिक शाश्वतता राखणे हा आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धोरणानुसार, नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयासाठी अर्थात अॅस्पिरेशनल टॉयलेट्स ठरविण्यात आलेल्या दरांप्रमाणे वापर शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाईल.






