मुंबई (प्रतिनिधी) : कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चे उद्घाटन शनिवारी पार पडले. देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उद्घाटनानंतर अॅकॅडमीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष आठवण काढली. सार्वजनिक बांधकामांच्या दर्जाबाबत त्यांचा असलेला काटेकोर दृष्टिकोन आणि गुणवत्तेचा आग्रह अधोरेखित करत फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे अभिनंदन करत, महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आल्याचे सांगितले. अवघ्या एका वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरिअम तसेच प्रशिक्षण सुविधा उच्च दर्जाच्या असून, संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नव्या न्याय, दंड आणि साक्ष संहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित वकिलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना देण्याचे काम हे केंद्र करेल. त्यामुळे न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन देशातील इतर राज्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अॅकॅडमी उभारल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.






