मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाल्यानंतर, आता राष्ट्रवादीची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हेही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी विचारविनिमय करून शनिवारी दुपारी आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील सर्व आमदार उपस्थित राहणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.






