Saturday, January 31, 2026

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या काही वैयक्तिक इच्छा आणि राजकीय हालचालींबाबतचे धक्केदायक खुलासे समोर येत आहेत. अजित दादांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणायच्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून विशेष प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, "शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हयातीतच दोन्ही गट एकत्र यावेत, अशी अजित दादांची मनापासून इच्छा होती. या प्रक्रियेसाठी खुद्द शरद पवारांनी माझ्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती." गेल्या सहा महिन्यांत या संदर्भात अनेक गुप्त बैठका पार पडल्या असून, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती. दादांच्या या अचानक जाण्याने राष्ट्रवादीच्या पुनर्रचनेच्या या प्रक्रियेला आता कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

१२ फेब्रुवारीला होणार होतं राष्ट्रवादीचं विलीनीकरण...पण त्याआधीच

येत्या १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी मुहूर्त ठरला होता, मात्र त्याआधीच काळाने अजित दादांवर झडप घातली. या प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, "बारामतीला होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी आम्ही विमानाने जाणार होतो, पण धावपट्टीच्या तांत्रिक अडचणीमुळे योग्य विमान मिळू शकले नाही. या संपूर्ण प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांनाही विश्वासात घेण्यात आले होते. आधी पक्ष एकत्र करायचा आणि नंतर इतर सत्तेचे निर्णय घ्यायचे, अशी अजित दादांची स्पष्ट भूमिका होती." दुसरीकडे, अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाचे सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे तिघे मिळून घेत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असून मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच तो पार पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'दादा रात्री घरी यायचे, एकत्र जेवण करायचो...

अजित दादा गेल्या काही काळापासून अत्यंत गुप्तपणे जयंत पाटील यांच्या संपर्कात होते आणि साहेबांच्या (शरद पवार) उपस्थितीतच पुन्हा घरवापसी करण्यासाठी ते आग्रही होते, असा खुलासा खुद्द जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित दादा अनेकदा रात्रीच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी येत असत. "गेल्या काही दिवसांत दादा किमान चार वेळा माझ्या घरी आले होते. आम्ही एकत्र जेवण करायचो आणि तासनतास पक्षाच्या भवितव्यावर चर्चा करायचो. जनमानसात निर्माण झालेली आपली प्रतिमा सुधारून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती," असे पाटील यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी संध्याकाळी दिलेल्या प्रतिक्रियेतही पाटील यांनी या छुप्या हालचालींचे संकेत दिले होते. केवळ सत्तेसाठी नव्हे, तर शरद पवारांच्या हयातीतच पक्ष एकसंध व्हावा यासाठी दादांनी मानसिक तयारी पूर्ण केली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.

८ ते १० वेळा गुप्त बैठका झाल्या होत्या

आणखी एक मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. गेल्या काही काळात दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल ८ ते १० वेळा गुप्त बैठका पार पडल्या होत्या असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी सांगितले की, "अजित दादा माझ्या घरी अनेकदा येत असत. सुरुवातीच्या ४ बैठकांमध्ये तर दादांनी केवळ त्यांच्या मनातील भावनांना वाट करून दिली. शरद पवार साहेबांबद्दल त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर होता. गेल्या दोन-अडीच वर्षांत जे काही राजकीय मतभेद झाले, ते सर्व विसरून पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध राष्ट्रवादी उभी करण्यासाठी ते अतिशय सकारात्मक होते." महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जुन्या ताकदीने उभा राहावा, ही दादांची अंतिम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून स्वतः पुढाकार घेतला होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर

१६ तारखेला झालेल्या एका निर्णायक बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकरणाचे सर्वाधिकार जयंत पाटील यांना दिले होते. जयंत पाटील यांनी सांगितले की, "१६ तारखेला माझ्या घरी महत्त्वाची बैठक झाली, ज्याला अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आम्ही आधी जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे आणि निकालानंतर ८ फेब्रुवारीला त्याची घोषणा करण्याचे ठरवले होते. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १२ फेब्रुवारीला अधिकृतपणे पक्ष एकत्र करायचे निश्चित झाले होते." विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेते अजित दादांना म्हणाले, "उद्याच पहाटे आपण साहेबांना भेटायला जाऊया." सुरुवातीला विमानाने जाण्याचे नियोजन होते, पण बारामतीची धावपट्टी लहान असल्याने विमान उतरू शकणार नव्हते. अखेर सर्व नेते पहाटेच गाड्यांनी बारामतीला निघाले आणि सकाळी ८ वाजता शरद पवारांच्या समोर बसले. तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच १२ फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायचे याच्याबद्दल दादांचा आग्रह होता. आता त्याचे बरेच तपशील आहेत, कधीतरी मोकळ्या वेळेत मी त्याचाही खुलासा करेल, पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याचे चर्चा आम्ही सगळ्यांनी सोबत चर्चा केली होती. काही वेळा सुप्रिया सुळे देखील त्यात उपस्थित होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली होती. त्यांनी मला हे देखील सांगितलं होतं की सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ त्यांच्या पक्षातील अन्य आमदारांना देखील याची त्यांना कल्पना दिलेली आहे. हे त्यांनी आम्हाला स्पष्ट पणाने सांगितलं होतं. अजितदादांचं असं मत होतं की, मी जेव्हा निर्णय सांगतो, तेव्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. हे सगळे माझे जे सहकारी आहेत ते मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील असं दादांनी म्हटल्यांचंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय

सुनेत्रा पवार यांचा मंत्रिमंडळातील शपथविधी आणि अजित पवार यांच्या पक्षातील सध्याच्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "सुनेत्रा वहिनींचा शपथविधी हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असून, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच हे सोपस्कार पार पडत आहेत," असे पाटील यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचा कारभार नक्की कोण चालवत आहे, यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमाणात छगन भुजबळ हेच घेताना दिसत आहेत. या तिन्ही नेत्यांच्या मतानुसारच सध्या पक्षाची पुढील दिशा ठरत असल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांनी यावेळी अधिक भाष्य करणे टाळले. "त्यांचा पक्ष सध्या आमच्यापासून स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर बोलणे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या पक्षात नक्की काय सुरू आहे, याची मला सविस्तर माहिती नाही," असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.

"नियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आले

"नियती किती क्रूर असू शकते, हे अजित दादांच्या जाण्याने दिसून आले," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित दादांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी एका स्थानिक सरपंचाच्या हवाल्याने खळबळजनक माहिती दिली आहे. विमान कोसळण्यापूर्वी हवेत असतानाच त्यातून मोठा आवाज येत होता, असे तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. अपघाताच्या कारणांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता की अन्य काही, हे आता केवळ 'ब्लॅक बॉक्स'च्या अहवालातूनच स्पष्ट होईल." अजित पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या संमतीने आणि एकमताने घेतला होता, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अजित दादांसोबतच्या नात्यावर भाष्य करताना पाटील भावूक झाले. "मी, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि आर. आर. (आबा) पाटील आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं. आमच्यात कधीही एकमेकांविरुद्ध स्पर्धा नव्हती. राजकारणात मर्यादा कशा पाळायच्या, याचे उत्तम भान दादांना होते. त्यांनी कधी माझ्यावर आणि मी कधी त्यांच्यावर टीकेची मर्यादा ओलांडली नाही," असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवार हे एक उत्तम मुख्यमंत्री ठरले असते...

"अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते, तर त्यांनी महाराष्ट्राचा कायापालट केला असता. कामाचा धडाका आणि अंमलबजावणीतील त्यांचा हातखंडा राज्यासाठी प्रभावी ठरला असता," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अजित दादांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. दादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा चेंडू जयंत पाटलांनी अजित पवार गटाच्या विद्यमान नेत्यांच्या कोर्टात टाकला आहे. जयंत पाटील म्हणाले की, विलीनीकरणाच्या चर्चेवेळी दादांचा एक ठाम विश्वास होता. "माझ्या पक्षात मी जे म्हणेन तेच होईल आणि एकही आमदार विरोधात जाणार नाही," याची त्यांना खात्री होती. मात्र, आता ज्या नेतृत्वाशी मी चर्चा करत होतो, तेच नेतृत्व (अजित पवार) आपल्यात नाही. त्यामुळे आता ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी पुढाकार घेऊन दादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करावे. अजित दादांची शेवटची इच्छा 'एकसंध राष्ट्रवादी' हीच होती. ही इच्छा पूर्ण करण्याची सद्बुद्धी सर्वांना मिळो, असे आवाहन जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >