Saturday, January 31, 2026

सुंदर स्वप्नातल्या बंगल्यातील मृण्मयीचं एक नातं असंही

सुंदर स्वप्नातल्या बंगल्यातील मृण्मयीचं एक नातं असंही

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 

बालकलाकार ते अभिनेत्री असा सुयश प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी सुपल. व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मृणामयीचं ‘एक नातं असंही’ या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आज पनवेलमध्ये आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे.

मृण्मयीचे शालेय शिक्षण वांद्रेच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. जेव्हा ती शिशू वर्गात होती, तेव्हाच तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तिने मिराकल्स अॅकॅडमीमधून मॉडेलिंगचा कोर्स केला होता. जेव्हा ती तिसरीत होती तेव्हा तिला बालाजी प्रॉडक्शनची स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हे बंध रेशमाचे’ ही मालिका मिळाली होती. ती चौथीत होती तेव्हा, तिला कलर्स वाहिनीवरील ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील छोट्या ईश्वरीची भूमिका मिळाली. तिला यातील भूमिकेसाठी म. टा. सन्मान अॅवॉर्ड मिळाले. या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी अमेरिकेतून फॅन्स तिला भेटायला भारतात आले. ही मालिका व ईश्वरीची भूमिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली.

ती पाचवीत असताना तिला ‘तू माझा सांगाती’ ही मालिका मिळाली. त्यामध्ये चिन्मय मांडलेकर होते, छोट्या आवलीची भूमिका तिने साकारली होती. संत तुकारामांची संसार गाथा व आवली यावर ही मालिका होती. त्यानंतर ती सहावीत असताना तिला संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये गोपिकाबाईची भूमिका तिने साकारली होती. त्या चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. नंतर 'रेडू' हा चित्रपट तिने केला. अमेझॉनची पेनाची जाहिरात तिने केली. तृतीयपंथ गौरव सावंतवरची एक डॉक्युमेंटरी होती, त्यामध्ये तिने गौरव सावंतच्या गायत्री नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पोलिओची जाहिरात केली. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेसोबत ‘ब्लॅक बोर्ड’ नावाचा चित्रपट केला. 'अँब्रो' नावाची एक शॉर्ट फिल्म तिने केली. त्यासाठी तिला इंटरनॅशनल बेस्ट चाईल्ड अॅक्ट्रेसचा अॅवॉर्ड मिळाला. 'भाकर,' 'बाजार','बंपर लॉटरी' हे चित्रपट तिने केले. नंतर तिने शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला.

त्यानंतर तिने कीर्ती कॉलेजला पुढील शिक्षण घेतले. तेथील सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. युथ फेस्टिवलमध्ये तिने भाग घेतला होता. अकरावीत असताना तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतील छोट्या रमाबाईची भूमिका मिळाली. ती भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.

खूप दिवसांपासून तिला नाटकात काम करण्याची इच्छा होती. तो योग जुळून आला. ' रेडू' चित्रपट करीत असताना निकिताने 'एक नातं असं’ही या नाटकवाल्यांकडे तिचे नाव सुचविले. या नाटकामध्ये तिची काव्या या मुलीची भूमिका आहे. ती केवळ कणखर मुलगी नसून, प्रेमळ बहीण आहे. ती अल्लड, खोडकर, समजूतदार स्वार्थी अशी सर्व गुणसंपन्न आहे. आजच्या काळातील ती मुलगी आहे.

आजच्या धावपळीच्या जगात नातेसंबंध दुरावलेले आहेत. भाऊ व बहिणीमधील दुरावा वाढत चाललेला आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी आपल्याकडे भाऊ, बहीण नसेल याची चिंता तिने व्यक्त केली. भाऊ-बहिणीच्या महत्त्वाच्या नात्यावर हे नाटक भाष्य करीत आहे. या नाटकानंतर बहीण-भावामधील वितुष्ट मिटेल असा आशावाद तिने व्यक्त केला.

'एक नातं असंही' हे नाटक नात्यातील गुंतागुंत, सद्यस्थितीवर भाष्य करणारं, थोडसं हसा पिकवणारं, सामाजिक विषय गांभीर्याने घेणारं असं हे नाटक आहे. कार्तिक आणि काव्या या भाऊ-बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आहे. कार्तिकला गायक व्हायचे असते; परंतु परिस्थितीमुळे तो हतबल होतो. बहिणीचे शिक्षण व्हावे म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो, त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध दृढ होतात? एका भावाने बहिणीसाठी केलेल्या त्यागाची जाणीव बहिणीला राहते का? या साऱ्या प्रश्नाची उकल या नाटकातून होणार आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग पनवेलच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ३१ जानेवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखन विस्मय दीपक कासार यांनी केले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांनी केले आहे. या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केले असून अभिजित भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत.

माणसाने कितीही आधुनिक प्रगती केली तरी, आपसातील नाते जपणे खूप आवश्यक आहे. ‘एक नातं असंही’ हे नाटक एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट सांगणार आहे.

Comments
Add Comment