Saturday, January 31, 2026

भयमुक्त परीक्षा

भयमुक्त परीक्षा

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना भयमुक्त व आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळणे गरजेचे आहे. अभ्यास, योग्य मार्गदर्शन, पालक-शिक्षकांचा सकारात्मक सहभाग आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल साधल्यास विद्यार्थी निर्धास्तपणे परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करतील.

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळाने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच दक्षता समिती व भरारी पथकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. असे असले तरी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देणे गरजेचे आहे. त्यासाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवायला हवा. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

भयमुक्त म्हणजे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभरातील केलेला अभ्यास अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित जाऊन नियमितपणे अभ्यास केलेला असेल त्यांना परीक्षेचे भय वाटणार नाही. असे विद्यार्थी आनंदाने परीक्षेला सामोरे जातात. जे विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा करतात असे विद्यार्थी जसजशी परीक्षेची तारीख जवळ येते तसतसे तणावाखाली येत असतात. त्यामुळे त्यांना परीक्षेला जाताना भय वाटत असते. याला कारणं सुद्धा अनेक असतील. मात्र विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठायचे असेल तर अभ्यास महत्त्वाचा असतो. शाळा सुरू झाल्यापासून विद्यालयामध्ये जसा अभ्यास शिकवून झालेला असेल त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास एके अभ्यास जरी केला तरी आपण एक विद्यार्थी आहोत, आपल्यासाठी कोणीतरी परिश्रम करीत आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांचे विचार शिक्षणाशी निगडित असावेत. शिक्षणामुळेच आपण मोठे होऊ शकतो याची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हायली हवी. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी दररोज आपल्या आवडीचे वेळेवर जेवण घ्यावे. व्यायाम करावा, खेळ व पुरेशी झोप घ्यावी. मात्र अति विचार टाळावेत. अनाठायी वेळ वाया घालवू नये. त्यात मध्ये टी. व्ही.वरील कार्यक्रम व बातम्या पाहाव्यात यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडत असते. असे नियमित करायला हवे. हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवणे गरजेचे असते. मन शांत ठेवल्याने अभ्यासामध्ये मन रमते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती आपोआप निघून जाते. खोडकर मित्रांचा नाद सोडून चांगल्या मित्रांच्या सहवासात राहावे. मोबाईलला चार हात दूर ठेवावे. आवश्यक कामासाठी मोबाईलचा वापर करावा. याचा परिणाम परीक्षेची तयारी झाल्याने विद्यार्थी हसत हसत आनंदाने परीक्षेला जातात. बरेच विद्यार्थी अभ्यासात चुकारपणा केल्याने परीक्षेच्या कालावधीत मानसिक तणावाखाली दिसतात. याचा परिणाम आपण काय करावे काय करू नये याचा विचार करीत विद्यार्थी असतात. अशावेळी त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी किंवा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्याला तसेच त्यांच्या पालकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यालयांनी किंवा एकत्रितपणे मानसोपचार तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात यावेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होते.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. या दोन्ही परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या भयातून मुक्त करायला हवे. हेच विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. वर्ष, महिने आणि आता काही दिवस परीक्षेला शिल्लक राहिले आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची दिशा या परीक्षांवर अवलंबून असते. आता बारावीच्या परीक्षेला १० दिवस आणि दहावीच्या परीक्षेला २० दिवस आहेत. वर्षभर आपण काय केले? किती तास अभ्यास केला? मार्गदर्शक कोण होते? गंमती जंमती काय केल्या? हे सर्व बाजूला ठेवावे. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासाची उजळणी करावी. त्याचप्रमाणे लिहिण्याचा सरावही नियमित करावा. आतापर्यंत आपल्याला प्रत्येक विषयात किती गुण मिळाले याची चर्चा करू नये. आता एकच लक्ष अंतिम परीक्षा. दिलेल्या वेळेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणे. ती सुद्धा उत्तरपत्रिकेत खाडाखोड न करता. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता. प्रश्नाच्या उत्तराच्या महत्त्वाच्या वाक्याखाली लाईन मारणे. प्रश्न नवीन पानावर सोडविणे. याची पूर्व सूचना शाळा सुरू झाल्यावर प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याविषयी अध्यापकांनी ज्या सूचना दिल्या असतील त्याचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नये. मन प्रसन्न ठेवून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या वेळेत लिहून पूर्ण करावीत. परीक्षेच्या कालावधीत भीतीविरहित विद्यार्थ्यांच्या मनात वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी परीक्षेच्या कार्यकाळात वातावरण निर्मिती अतिशय महत्त्वाची असते. तरच विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला भयमुक्त परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करू शकतात.

Comments
Add Comment