ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला चालना देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला चार्जिंग स्टेशन्सचा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे. येत्या काही महिन्यांत ठाण्यातील विविध १९ मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’(पीपीपी) तत्त्वावर राबवला जाणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च खासगी ठेकेदार करणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यातील १० टक्के हिस्सा महापालिकेला मिळेल. तसेच महापालिकेला किमान एक रुपया प्रतियुनिट दराने महसूल मिळणार आहे. ६ मे २०२५ रोजी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, १० वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चार्जिंगचे दर केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील.
चार्जिंग स्टेशन्सची उभारणी, त्याचे संचालन, नियमित देखभाल, वीजजोडणी आणि सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित निविदाधारकावर असेल. विशेष म्हणजे, या स्टेशन परिसरात कोणत्याही व्यावसायिक जाहिराती करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाडा-कोपरी : मनोरुग्णालय चौक, कशिश पार्क सेवा रस्ता. उथळसर : वृंदावन बस स्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा - राबोडी. वागळे : रोड क्रमांक २२, पासपोर्ट कार्यालयाजवळ लोकमान्य सावरकर नगर : लोकमान्य बस डेपो जंक्शन, पोखरण रोड क्र. १, देवदया नगर. वर्तक नगर : पोखरण रोड क्र. २, गांधी नगर जंक्शन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ. माजिवडा-मानपाडा : आनंद नगर बस स्टॉप, पातलीपाडा, यूआरसीटी जंक्शन, धर्माचा पाडा.कळवा : खारेगाव सेवा रस्ता (९० फूट रोड), खारेगाव टोलनाका, आत्माराम चौक.मुंब्रा व दिवा : मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिवा येथील आयुष्यमान आरोग्य केंद्र.






