Friday, January 30, 2026

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळाशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेची भूमिका शिष्टमंडळासमोर मांडण्यात आली. शिष्टमंडळाने सादर केलेल्या मुद्देनिहाय तसेच ऐनवेळी चर्चेला गेलेल्या विषयांवर सविस्तर आणि सांगोपांग अशी चर्चा केली गेली. दरम्यान,मुंबई महानगरपालिका मराठी शाळांबाबत चुकीचे धोरण राबवित असल्याचे जे आभासी चित्र निर्माण केले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन संवेदनशील आहे. मुंबईतील मराठीसह इतरही माध्यमांच्या शाळा आणि विद्यार्थी संख्या वाढावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन साततत्याने विविध उपक्रम, योजना राबवित असते. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचं ध्येय आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पालकांचेही समुपदेशन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा ९५ टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत ९७ टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी उपलब्ध जागेमध्ये क्रीडाची प्रशिक्षण दिले जाते.
खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचा अतिरिक्त सराव विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत उत्तम परिणाम दिसून येत आहे. महानगरपालिका विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी (एफएलएन) निपूण भारत अंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तमप्रकारे वाचू शकतो.  तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरित्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे.
मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे.  महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही.मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संचालित मराठी माध्यमांच्या सर्व शाळा प्रभावीपणे चालविण्यासाठी  महानगरपालिका प्रशासन पूर्वीपासूनच गांभीर्याने नियोजन व कार्यवाही करीत आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये, किंबहुना ही संख्या वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मागील १० ते १५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभिनव उपक्रमही राबवले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या  शिष्टमंडळाला बैठकीत दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा