मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन जाहिरात फलक (होर्डिंग) लावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. तसेच, संबंधित लोखंडी संरचना आणि फलक हटवून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच अनधिकृत फलक लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील प्रवेशद्वार क्रमांक-५ च्या दोन्ही बाजूस महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावण्यात आले होते. सुमारे २० बाय २० फूट आकाराच्या या फलकासाठी दोन्ही ठिकाणी लोखंडी संरचना अर्थात स्टँड उभारण्यात आले होते. यासंदर्भात, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून संबंधित जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांना २९ जानेवारी २०२६ लेखी नोटीस बजावून अनधिकृत जाहिरात फलक आणि लोखंडी संरचना तत्काळ हटवण्याची सूचना देण्यात आली होती. तरीही , त्यांनी हा फलक आणि लोखंडी संरचना न हटवल्यामुळे त्यांच्याविरोधात ३० जानेवारी २०२६ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३ व ४ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, सह कलम ३२८, ४७१ अन्वये ही कारवाई करण्यात आली. तसेच, ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागातील परवाना विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हटवण्याची कारवाई करत या फलक आणि लोखंडी संरचनेचे साहित्य जप्त केले.
संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार
जाहिरातदार तसेच संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावून विद्रुपीकरण करु नयेत. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच, अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई नियमितपणे सुरूच राहील. - विनायक विसपुते सहायक आयुक्त (जी उत्तर)






