Friday, January 30, 2026

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा व्हाईट वॉश देण्याकरिता मैदानात उतरलेल्या शिवसेनेसमोर तालुक्यात चार पक्षांची झालेली महाआघाडी मोठे आव्हान उभे करणार असे वाटत आहे. भाजपा व काँग्रेस आय या पक्षाचे निवडणुकांमधील स्वतंत्र अस्तित्व व महाआघाडीतील राष्ट्रवादी व उबाठा शिवसेना या दोन प्रमुख पक्षांची जागा वाटपाची धुसफूस कोणाच्या पथ्यावर पडणार याबद्दल तालुक्यात अंदाज बांधणे सुरु झाले आहे. महायुतीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रसे अजीत पवार गटाने सेनेच्या विरोधात असलेल्या सर्व मतप्रवाहांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना पूर्णपणे यश आले नाही. अगदी महाआघाडीची घोषणा करुनही भिंगळोली पंचायत समिती गणात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे या संर्घषाला मैत्रीपूर्ण लढतीचे गोंडस रुप देत या गणात दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार अधिकृतपणे उतरवले आहेत. भिंगळोली जिल्हा परिषद गटाचा विचार करता शिवसेना, उबाठा शिवसेना व काँग्रेस) अशी तिरंगी लढत होणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे व अस्मिता केंद्रे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. बाणकोट जिल्हा परिषद गटांचे निवडणुकांचा विचार करता या गटात (शिवसेना) (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) (बसपा) अशी तिरंगी लढत होत आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांची अनेक वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पंचायत समिती गणाचा विचार करता इस्लामपूर पंचायत समिती गणात उ.बा.ठा., भाजपा, शिवसेना अशी तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत माजी सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिंगळोली पंचायत समिती गणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उ.बा.ठा., काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. या गणात राष्ट्रवादी व उबाठा यांची उमेदवारी असतानाही दोघांनीही स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले आहे. मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. बाणकोट पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे आहे. तुळशी पंचायत समिती गणात शिवसेना, भा.ज.पा., वंचित बहुजन आघाडी, उ.बा.ठा अशी चौरंगी लढत होणार असल्याने ती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीत केवळ स्वबळावर उतरलेल्या शिंदे सेनेस मोठे आव्हान देण्यास विरोधक यशस्वी होतात का याचे उत्तर आगामी काळात मिळेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >