मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार आहे. त्यासाठी उद्या, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार आहे. एकमत झाल्यास सुनेत्रा पवार यांचा शपथविधी तातडीने पार पडण्याची शक्यता असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अजित पवार ज्या पद्धतीने अचानक गेले, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र, ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीनुसार पक्ष आणि सरकारचा कारभार सुरू ठेवण्यासाठी जबाबदारी कुणावर तरी सोपवणे आवश्यक आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले विधिमंडळ पक्षनेतेपद रिक्त झाले असून, ते पद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावे, अशी अनेक आमदारांची भावना आहे. या मागणीत काहीही गैर नाही, मात्र अंतिम निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतच होईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळ यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्रीपद सध्या रिक्त असून ते पद सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून भरता येईल का, यावर पक्षाचे लक्ष केंद्रित आहे. आज होणाऱ्या बैठकीत जर सर्वांचे एकमत झाले, तर उद्या किंवा परवा शपथविधी होऊ शकतो. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यावर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाकडून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यानंतर निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले जाणार आहे. राज्यपालांच्या कार्यक्रमानुसार शपथविधीचा वेळ निश्चित केला जाईल, असे समजते.
निर्णय आमदारांशी चर्चा करूनच - प्रफुल्ल पटेल
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आज केवळ प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली असून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड करायची, याबाबत पक्षातील आमदारांशी चर्चा करून आणि सर्वांच्या भावना समजून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
- सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे पटेल यांनी नमूद केले. सध्या ही बाब अंतर्गत चर्चेपुरतीच मर्यादित असून जनभावना, आमदारांचे मत आणि पक्षाची भूमिका लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शोकाची परिस्थिती असून घरगुती धार्मिक विधी सुरू आहेत. हे विधी पूर्ण झाल्यानंतर रात्री किंवा उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- अजित पवार हे अनुभवी नेते होते आणि राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे असल्याचे पटेल यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शोकातून सावरलो नाही, धार्मिक विधीनंतर निर्णय - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेश कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून पक्षातील कोणीही अद्याप सावरलेले नाही. अजित पवार आजही आपल्यातच आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणेही क्लेशकारक होते. याच कार्यालयातून त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले आणि त्यांच्या आठवणींना अभिवादन करण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय धार्मिक विधींमध्ये सहभागी असून, हे विधी पूर्ण झाल्यानंतरच पुढील राजकीय चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट प्राथमिक स्वरूपाची होती. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या तसेच आमदारांच्या भावनांनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या संपूर्ण राज्य शोकसागरात असून, त्या भावनिक वातावरणातच पक्ष निर्णयप्रक्रियेतून जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.