Friday, January 30, 2026

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी प्रशासकीय आणि राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थमंत्रालय आणि उपमुख्यमंत्रिपद आता कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मोठा दावा केला असून, उद्याच राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत निर्णायक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर तातडीने राजभवनावर शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. पक्षातील आमदारांचा कल हा सुनेत्रा पवार यांच्याच बाजूने असून, अजितदादांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवण्यासाठी त्यांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे आहेत. उद्याचा दिवस राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सत्तेच्या समीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

"शो मस्ट गो ऑन!"...

"अजितदादांच्या जाण्याने पक्षात आणि सरकारमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, हे सत्य आहे. पण 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे आपल्याला पुढे जावेच लागेल. कोणाला तरी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल," असे म्हणत भुजबळांनी पक्षाचे आणि सरकारचे कामकाज थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांच्या भावनांबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात मोठी लाट आहे आणि ही मागणी मुळीच चुकीची नाही. अजितदादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवारांच्या रूपाने हे महत्त्वाचे पद भरता येईल, याकडे सध्या पक्षाचे लक्ष केंद्रित आहे. पक्षाचे अध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद कोणाकडे द्यायचे, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या मुंबईत सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जे ठरेल, त्यानुसार सत्तेचा पुढील गाडा हाकला जाईल, असे संकेत भुजबळांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >