Friday, January 30, 2026

मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे खोदकामामुळे परिस्थिती गंभीर

मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वर  येथे खोदकामामुळे परिस्थिती गंभीर
व्यापारी, कर्मचारी व नागरिकांना नियोजनाअभावी बसतोय मोठा फटका

संगमेश्वर  : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे संगमेश्वर तालुक्यात नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. संगमेश्वर–सोनवी पुलाच्या दरम्यान गेली तब्बल १७ वर्षे रखडलेले काम सध्या सुरू झाले असले तरी नियोजनाअभावी ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या खोदाईमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. संगमेश्वर येथे महामार्गालगत असलेल्या दुकानांपर्यंत जाण्यासाठी तसेच महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बँका, शासकीय सेतू कार्यालये व इतर आस्थापनांकडे जाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हिस रस्ते न करता थेट खोदाई सुरू करण्यात आल्याने अनेक दुकाने, शासकीय कार्यालये व बँका बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा थेट फटका व्यापारी, कर्मचारी व नागरिकांना बसत आहे.

महामार्गावर काम सुरू असताना रस्तादर्शक फलक, पर्यायी मार्गांची माहिती किंवा वाहतूक नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अवजड वाहने थेट संगमेश्वर बाजारपेठेच्या रस्त्याकडे वळत आहेत. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यातच, रात्रीच्या वेळी खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने संभाजीनगर संगमेश्वर येथील पवार नामक एक महिलेचा अपघात होऊन ती खाली कोसळल्याची घटना घडली. यामुळे तीच्या डोक्याला आणि पायाला मार लागला असून तीला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे काम सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात होण्याची शक्यता वारंवार लक्षात आणून दिली असतानाही ठेकेदार कंपनी व संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे संगमेश्वरवासीयांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, “ठेकेदार कंपनीला नेमकी कधी जाग येणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तत्काळ सर्व्हिस रस्त्यांची निर्मिती, योग्य दिशादर्शक फलक, रात्रीची प्रकाश व सुरक्षा व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रण याची मागणी जोर धरू लागली आहे.

तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनीच्या माणसांना फलक लावण्याच्या सूचना दिल्या असता त्यांनी मुजोरीची भाषा वापरत फलक लावणार नाही, काय करायचे ते करा असे सांगितले. संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम म्हणजे पादचारी, वाहनचालक यांच्यासाठी दररोजचे मरण असून येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी ही नियोजनाच्या अभावी होत आहे. याकडे ना ठेकेदार लक्ष देत ना राष्ट्रीय महामार्ग विभाग. संगमेश्वर येथे मोठे आंदोलन होऊन देखील याची कोणीही दखल घेत नसल्यामुळे संगमेश्वरला कोणी वालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमेश्वर येथे ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने येतात आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >