भाजपची रणनीती निर्णायक
उल्हासनगर :उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राजकारण आता केवळ संख्याबळावर नव्हे, तर डावपेच, लॉबिंग आणि अंतर्गत ताकदीवर ठरत आहे. यंदा महापौरपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात उघड रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी, साई पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने ४० नगरसेवकांचा गट तयार केला असून, बहुमताचा दावा केला आहे. मात्र, टीम ओमी कलानीकडूनही ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक असल्याने गटांतर्गत अंतर्गत चुरस वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतून कोण महापौरपदासाठी पुढे येईल आणि टीम ओमी कलानीचा उमेदवार अंतिम क्षणी बाजी मारेल की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण महापालिकेतील महापौरपदाच अंतिम निर्णय त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे.
भाजपचे गणित : ७८ सदस्यीय महापालिकेत भाजपचे ३७ नगरसेवक आहेत, म्हणजे फक्त तीन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसच्या अंजली साळवे यांनी तटस्थ राहण्याचे संकेत दिले असले, तरी वंचित बहुजन आघाडीचे दोन, साई पक्षाचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भाजपची परिस्थिती थोडी अडचणीत आहे. तरीही भाजप पूर्णपणे शर्यतीबाहेर नाही; शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी 'महायुतीचाच महापौर होईल' असा विश्वास व्यक्त केला आहे आणि भाजपकडून योग्य वेळेला राजकीय डावपेच राबवण्याची तयारी सुरू आहे.