Friday, January 30, 2026

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी पाऊस पडल्याची नोंद नाही. मात्र, मळभ वातावरण तयार झाल्याने याचा थेट फटका जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना बसण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादन सध्या निर्णायक टप्प्यात असताना, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा फळपीक ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होते. यातून मागील वर्षी १८ लाख ४ हजार ६०२ इतके उत्पादन घेण्यात आले होते. आंबा उत्पादकता ३ टन एवढी झाली आहे. तसेच जिल्ह्यात ११ लाख २ हजार ५५७ क्षेत्रामध्ये १ लाख ४२ हजार ०२० इतके उत्पादन घेण्यात आले. काजुची उत्पादकता १.५ टन झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन वाढीची आशा निर्माण झाली होती. यंदाच्या हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा व काजू झाडांना चांगला मोहर आला होता. मात्र हा मोहर टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांनी लाखो रुपयांची औषध फवारणी केली आहे.  मागील दोन वर्षांत उशिरापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे आंबा व काजू बागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बागायतदारांसमोर यंदाही तसाच धोका उभा ठाकला आहे. वाढता कामगार खर्च, औषध फवारणीचा खर्च आणि त्यामानाने अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास आलेल्या उत्पन्नातून खर्च भागवणे अवघड होत असल्याची प्रतिक्रिया बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा