Friday, January 30, 2026

Mardaani 3 Twitter reviews : राणी मुखर्जीचा बॉक्स ऑफिसवर धमाका! 'मर्दानी ३' ला प्रेक्षकांची पसंती; धमाकेदार प्रतिक्रिया समोर

Mardaani 3 Twitter reviews : राणी मुखर्जीचा बॉक्स ऑफिसवर धमाका! 'मर्दानी ३' ला प्रेक्षकांची पसंती; धमाकेदार प्रतिक्रिया समोर

मुंबई : बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मर्दानी ३' आज ३० जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राणीच्या अभिनय कारकिर्दीला ३० वर्षे पूर्ण होत असतानाच आलेला हा चित्रपट तिच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरत आहे. 'शिवानी शिवाजी रॉय' या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत राणीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे.

'मर्दानी ३' बद्दल प्रेक्षक काय म्हणत आहेत?

या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता चाहते चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. अनेक प्रेक्षकांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर आपले रिव्ह्यू शेअर केले असून, अनेकांनी याला 'पैसा वसूल' चित्रपट म्हटले आहे. एका युजरने राणीच्या अभिनयाचे कौतुक करताना लिहिले की, "⭐⭐⭐/5 #Mardaani3 — एक अतिशय तीव्र आणि प्रभावी क्राईम ड्रामा आहे. राणी मुखर्जीने ताकदवान आणि निर्भीड अभिनय केला असून, तिने संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. जबरदस्त ॲक्शन, खिळवून ठेवणारा उत्तरार्ध आणि भावूक क्लायमॅक्स; हा चित्रपट खरोखरच गंभीर, परिणामकारक आणि पैसा वसूल आहे."

दुसऱ्या एका चाहत्याने सविस्तर रिव्ह्यू शेअर करताना लिहिले की, "मर्दानी ३ हा चित्रपट या फ्रँचायझीच्या मूळ उद्देशाशी पूर्णपणे प्रामाणिक राहतो, ज्यात वास्तववाद, नैतिक तातडी आणि गुन्हेगारी व न्यायाकडे पाहण्याचा एक निर्भीड दृष्टिकोन दिसून येतो. हा केवळ वरवरचा झगमगाट असलेला आणि साध्या मनोरंजनासाठी बनवलेला थ्रिलर चित्रपट नाही; तर हा एक अत्यंत परिणामकारक आणि भावनिकदृष्ट्या जड असा चित्रपट आहे, जो तुमचे मनोरंजन करण्यापूर्वी तुम्हाला अंतर्मुख करतो आणि अस्वस्थ करतो."

प्रेक्षकाने पुढे दिग्दर्शकाचे कौतुक करताना म्हटले की, त्यांनी एका अत्यंत समर्पक सामाजिक विषयाची तीव्रता कमी न करता तो प्रभावीपणे मांडला आहे. तसेच चित्रपटाचा उत्तरार्ध अतिशय उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "#राणीमुखर्जीने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की 'शिवानी शिवाजी रॉय' हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पोलीस पात्रांपैकी एक का आहे. तिने एक करारी आणि निर्भीड अभिनय सादर केला असून, त्यामध्ये कणखर निर्धार आणि भावनिक खोलीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. तिची पडद्यावरील उपस्थिती (screen presence) एकटीच संपूर्ण चित्रपट पेलून धरते आणि तिच्या या फ्रँचायझीमधील सर्वोत्तम कामगिरींपैकी ही एक आहे. या चित्रपटातील खलनायक हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. #मल्लिकाप्रसाद खरोखरच भयावह वाटली असून तिने 'मर्दानी'मधील स्मरणीय खलनायकांची परंपरा कायम ठेवली आहे. #जानकीबोडीवाला यांच्यासह इतर सहकलाकारांनीही आपली भूमिका चोख बजावली असून कथेला भावनिक जोड दिली आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >