वेंगुर्ले : माझे नेते खा.नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या पुढे जिल्हा परिषद सदस्य पदच काय कुठचेही पद माझ्यासाठी मोठे नाही. त्यांच्या स्वाभिमानासाठी पदच काय वेळ पडल्यास मान कापून देण्याची ही तयारी आहे. धनशक्तीच्या जोरावर काहींनी मला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या बाजूने असलेल्या लोकशक्ती पुढे टिकू शकत नाहीत. वेंगुर्ले तालुक्यात महायुतीचे जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे दहा ही उमेदवार आणण्याचा निर्धार करुया. त्यासाठी माझा एकट्याचा राजकीय बळी गेला असे मी समजेन. पण झुकणार नाही. वेंगुर्ले तालुक्याच्या विकासासाठी यापुढे अजून जोमाने कामाला लागेन सर्वांनी असेच प्रेम कायम ठेवा. सात तारीख ला विजयाचा गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे यासाठी एक संगमने काम करूया असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. दरम्यान मधल्या काळात घडलेल्या सर्व घटना सविस्तर नावांसह ८ तारखेला जाहीर करणार अशी स्पष्ट भूमिका मनीष दळवी यांनी मांडली आहे.
मनीष दळवी यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी अचानक मागे घेतला. त्यामुळे विविध चर्चा सुरू होत्या. म्हणूनच वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात आज सायंकाळी मनीष दळवी यांच्या मित्र परिवाराकडून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर महायुतीच्या आडली जिल्हा परिषद उमेदवार समिधा नाईक, आडेली पंचायत समिती उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी पंचायत समिती उमेदवार शितल राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राऊत, शिवसेना पक्षनिरीक्षक राजेश मोरे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वसंत तांडेल, निलेश सामंत, प्रितेश राऊळ, दाजी परब, बोवलेकर, रवी खानोलकर, पाटकर, प्रशांत खानोलकर, सर्व गावचे सरपंच, नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यात महायुतीचे सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत. मला येथे गुंतून ठेवून अन्य चार ठिकाणी महायुती मध्ये बिघाडी करून उमेदवारांना पराभूत करणे यासाठी काही जण प्रयत्न करत होते. परंतु त्यांचा डाव आम्ही उलटून लावला. यासाठी मला माझी उमेदवारी मागे घ्यावी लागली. याबाबत मी बरोबरच्या कुणाही पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली नाही. मात्र आमचे नेते आणि मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून राणे साहेबांच्या आदेशाने हा निर्णय घेतला. त्याबाबत आता चर्चा करून वेळ दवडण्यात अर्थ नाही. आम्ही सर्वांनी योग्य उत्तर तुमच्या सर्वांच्या साथीने नक्की देणार. आता फक्त उर्वरित पाच दिवसात जोमाने प्रचार करून आपल्या महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणे हे आपले ध्येय आहे. कोणी कितीही धनशक्तीचा दबाव आणला तरी आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. त्यामुळे एकजुटीने आणि एक संघपणे प्रचार करू या. माहितीच्या अधिकृत सर्व उमेदवारांना निवडून आणू या आणि आपली एकजूट ताकद दाखवून देऊया असेही मनीष दळवी यांनी सांगितले.






