Friday, January 30, 2026

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास, जेव्हा शाळा आणि कामावर जाणाऱ्यांची मोठी वर्दळ होती, त्याचवेळी उड्डाण पुलाखालील बोगद्याच्या स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळला. सुदैवाने, ज्या क्षणी हे सिमेंटचे भाग खाली पडले, त्याक्षणी बोगद्यातून कोणीही जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अवजड वाहनांच्या कंपनांमुळे (Vibrations) हा स्लॅब कोसळल्याने पुलाच्या मजबुतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे संभाव्य धोका टळला. त्यांनी तातडीने रस्ता अडवून पोलिसांना पाचारण केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आयआरबी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. भविष्यात संपूर्ण पूल कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आयआरबीकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ?

आयआरबी (IRB) कंपनीने केलेल्या 'तात्पुरत्या' मलमपट्टीमुळे नांदगाव पेठ येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले खरे, मात्र केवळ वरवरची डागडुजी करून त्यांनी जबाबदारी झटकल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. हा मार्ग विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारांसाठी महत्त्वाचा दुवा असताना, सुरक्षेच्या नावाखाली केलेली ही मलमपट्टी भविष्यात जीवघेणी ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सांगण्यानुसार, हा पूल आता 'मृत्यूचा सापळा' बनला असून, नुसतंच त्याला सिमेंट लावून तडे लपवण्याची काम सुरु आहे. जोपर्यंत पुलाची कायमस्वरूपी आणि ठोस दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असेल. "आयआरबी प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल विचारत, ग्रामस्थांनी या निकृष्ट कामाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. ठोस उपाययोजना न केल्यास हा रस्ता पूर्णपणे रोखून धरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

१३ वर्षांनंतर निकृष्ट बांधकामाची पोलखोल

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान २०१३ मध्ये आयआरबी (IRB) कंपनीने केलेल्या बांधकामाचे पितळ आता उघड पडले आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून आणि कोणतीही मागणी नसताना कंपनीने त्यावेळी मनमानी पद्धतीने येथे बोगदे उभारले होते. आज स्लॅब कोसळल्याच्या घटनेमुळे, २०१३ मधील त्या 'घाईघाईच्या' आणि 'निकृष्ट' कामाची आता जाहीर पोलखोल झाली आहे. उड्डाण पुलावरून अवजड वाहने भरधाव वेगाने जात असताना बोगद्याच्या संरचनेत तीव्र कंपन जाणवत आहे. या कंपनामुळे केवळ बोगदाच नाही तर संपूर्ण पुलाची स्थिती धोकादायक झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. अगदी १३ वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आलेला हा तांत्रिक दोष आता प्रत्येकासाठी जीवघेणा ठरत असून, कंपनीने केवळ नफा कमावण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा बाली दिल्याचा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांकडून हा संपूर्ण उड्डाण पूल तातडीने ऑडिट करून दुरुस्त न केल्यास मोठी दुर्घटना अटळ असल्याची भीती व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >