मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. घसरण झाली तरी सोन्याचांदीचे सध्याचे दर हे मध्यमवर्गीयांच्या खिशावर ताण निर्माण करणारे असेच आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी सोन्याचांदीची खरेदी करायची असल्यास हाती मोठी रक्कम बाळगण्याशिवाय पर्याय नाही.
ट्रम्पचे सतत बदलणारे धोरण, डॉलरच्या मूल्यात वेगाने होत असलेले बदल यामुळे मागील काही दिवसांत जगाचा सोन्याचांदीकडे असलेला ओढा वाढू लागला आहे. यामुळेच मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ७८ हजार ८५० रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख ६९ हजार २०० रुपये झाला. सोन्याच्या दरात नऊ हजार ६५० रुपयांची घसरण झाली.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठा चढउतार दिसून आला. मुंबईत गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी एक किलो चांदीचा दर चार लाख दहा हजार रुपये होता. पण आज म्हणजेच शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी दरात घसरण झाली आणि एक किलो चांदीचा दर तीन लाख ९५ हजार रुपये झाला. चांदीच्या दरात पंधरा हजार रुपयांची घसरण झाली.






