राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने अजितदादा यांच्यानंतर आपल्या अजून एका मोठ्या नेत्याला गमावले आहे. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे.
वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास :
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज, शुक्रवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी लढत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांनी आपले प्राण सोडले.
कोण होते शांतीलाल सुरतवाला?
शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौरपद भूषवले. शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. काँग्रेस मध्ये असताना पुण्यातील शरद पवार गटाचे नेतृत्व त्यांनी केले. मान कापली तरी पवार साहेबांना सोडणार नाही, असं ते नेहमी म्हणायचे. गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नव्हते.






