मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भवितव्याबाबत तसेच अजित पवार यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होण्याची गरज व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या खात्यांबाबत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित निर्णयांबाबत अनिश्चितता कायम राहू नये, ही आमची भूमिका आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि जनतेच्या भावना लक्षात घेता विलंब न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका मांडली आहे.
ते पुढे म्हणाले की, अजितदादा हे अनुभवी नेते होते, त्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. येत्या काळात यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ आणि उत्पादन शुल्क ही खाती राष्ट्रवादीकडे कायम ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
नरेश अरोरा सुनेत्रा पवारांच्या भेटीला
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्ल्यासाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले असून, अरोरा हे दुपारी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीला पोहोचले.






