Friday, January 30, 2026

Canada America Conflict : कॅनडा-अमेरिका वाद शिगेला; कॅनेडियन विमानांवर ५०% कर लादण्याची ट्रम्प यांची धमकी

Canada America Conflict : कॅनडा-अमेरिका वाद शिगेला; कॅनेडियन विमानांवर ५०% कर लादण्याची ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे.  यावेळी त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकन विमान उत्पादक कंपनी गल्फस्ट्रीमसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपमुळे आता कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नेमका आरोप काय ?  
अमेरिकेच्या प्रतिष्ठित विमान उत्पादक कंपनी गल्फस्ट्रीमच्या ५००, ६००, ७०० आणि ८०० या सिरीजच्या विमानांच्या मान्यतेला कॅनडाने जाणूनबुजून आणि बेकायदेशीरपणे नकार दिल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केला आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले की; गल्फस्ट्रीम जेट्स ही जगातील सर्वात आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत विमान उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. तरीही कॅनडा त्यांना गेली अनेक वर्षे मान्यता देत नाही आहे. ट्रम्प यांच्या दृष्टीने हा कॅनडा देशाचा अमेरिकन कंपन्यांविरुद्ध हा भेदभाव आहे. त्यांच्या या भेदभाव वृत्तीला सडेतोड उत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यांचा हा निर्णय जोपर्यंत गल्फस्ट्रीम जेट्सना कॅनडाकडून पूर्ण मान्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत लागू राहील असे सांगितले.
काय आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय ? 
ट्रम्प यांच्या निर्णयानुसार जर कॅनडाने गल्फस्ट्रीम जेट्सना तातडीने मान्यता दिली नाही तर अमेरिका कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व विमानांवर '५० टक्के' इतका कर लादेल. या विधानानंतर अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार हा वाद केवळ विमान वाहतूक उद्योगापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम या दोन्ही देशांमधील व्यापार आणि राजनैतिक संबंधांवरही होऊ शकतो. या सर्व परिस्थितीवर कॅनडाचे  पंतप्रधान नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Add Comment