मुंबई : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली असून, तो या स्पर्धेतील तीन राष्ट्रीय विजेत्यांपैकी एक ठरला आहे. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) २०२५ अंतर्गत पृथ्वी विज्ञान मंत्रालय व MyGov यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या देशव्यापी उपक्रमाची घोषणा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली. विद्यार्थ्यांनी, स्टार्टअप्सनी आणि तरुण नवोन्मेषकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला पूरक, व्यवहार्य आणि उपयुक्त कल्पना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते. देशभरातून प्राप्त झालेल्या १,०६२ प्रवेशिकांमधून केवळ तीन नवोन्मेषकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव विजेता म्हणून अरजित अमोल मोरे याची निवड झाली असून, त्यामुळे राज्याला तसेच त्याच्या स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर (मुंबई) या शाळेला गौरव प्राप्त झाला आहे.
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदकाचा मानकरी असलेला अरजित ‘लिट्लन्टिस्ट’ (लिटल सायंटिस्ट) या नावानेही ओळखला जातो. त्यानी ‘जिज्ञासा : फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ हे पुस्तकही लिहिले असून, ते सीएसआयआर–नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL), पुणे येथे झालेल्या ‘वन डे अॅज अ सायंटिस्ट’ भेटीतून प्रेरित आहे. अरजित याचा विजयी नवोन्मेष ‘इल्युम्ब्रेल्ला २.०’ हा प्रकल्प चलनशील सौरऊर्जा आधारित प्रणाली असून, ती रस्त्यावरील विक्रेते, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरेल. छत्रीच्या संकल्पनेवर आधारित ही प्रणाली प्रकाश, मोबाईल चार्जिंग आणि मूलभूत वीजपुरवठा देत असून, पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी करते. हा नवोन्मेष परवडणारा, हलविण्यास सोपा आणि प्रत्यक्ष वापरात उपयुक्त असल्याचे मानले जात आहे. या संकल्पनेवर अरजितने दोन संशोधन प्रबंध प्रकाशित केले असून, त्यात तांत्रिक व्यवहार्यता आणि सामाजिक परिणाम मांडण्यात आले आहेत.






