अजित पवारांचा पाच दिवसांपूर्वी मराठवाड्याचा शेवटचा दौरा

डॉ. अभयकुमार दांडगे


२५ जानेवारी रोजीच सायंकाळी साडेपाच वाजता ते नांदेडच्या विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. पाच दिवसांपूर्वीच नांदेडला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ एका विमान दुर्घटनेत अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जातील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही.


महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अजित पवार नांदेडच्या विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी वेळ असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. तेथून दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते व भाविकांशी चर्चा करून ते नांदेड येथील मोदी मैदान येथील कार्यक्रमाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी १६ मिनिटे मराठी व हिंदीतून भाषण केले. श्री गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करून त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. विशेष म्हणजे निवेदकांच्यावतीने त्यांना भाषणाअगोदरच मराठी आणि हिंदीतून या दोन्ही भाषेतून मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो शब्द पाळत १६ मिनिटांचे भाषण केले. मराठवाड्यासाठी त्यांचा हा दौरा शेवटचा दौरा ठरला. २५ जानेवारी रोजीच सायंकाळी साडेपाच वाजता ते नांदेडच्या विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. पाच दिवसांपूर्वीच नांदेडला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ एका विमान दुर्घटनेत अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जातील, असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण मराठवाडा हळहळला. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांत त्यांचे मराठवाड्यात पाच दौरे झाले होते. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर हे गाव अजित पवार यांची सासरवाडी. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच धाराशिव जिल्ह्यात बंद पाळून अजितदादांना आदरांजली वाहण्यात आली.


नगरपालिका व पंचायत समिती निवडणूक प्रचारानिमित्त दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात चांगलीच पकड निर्माण केली. या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. अजित पवार यांची कार्यशैली अलीकडच्या काळात मराठवाड्यात चांगलीच गाजली. राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे आहे. विकासासाठी मी कधीही तयार आहे, असे सांगून त्यांनी मराठवाड्यातील अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला होता. मराठवाड्यातील धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात ते जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त काही दिवसांत येणार होते. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनातच होते. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली,बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात शोककळा पसरली. राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी तसेच नि:स्पृह नेता गेल्याने मराठवाडा हळहळला. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपूर्ण मराठवाड्याला कायमस्वरूपी लक्षात राहण्याजोगे आहे.


१ जानेवारी २०२६ रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक् केले होते. केवळ इमारतीच नव्हे तर निसर्गाशी नाते जोडलेले राहावे या उद्देशातून तीस लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. बीडच्या विकासाची ग्वाही त्यांनी वारंवार दिली होती. त्यामुळे बीडच्या जनतेनेही त्यांना भरपूर प्रेम दिले. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर - बीड रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये हे अजित दादांनी अर्थमंत्री म्हणून मंजूर केले होते. राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे तसेच नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे, परभणीचे आमदार राजेश विटेकर यांना अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोठा धक्का बसला. या आमदारांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी देखील धाय मोकलून रडत होते. मराठवाड्यातील धाराशिव येथील तेर गावचे अजित पवार हे जावई होत. राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक गेल्याने धाराशिव जिल्ह्यात प्रचंड शोककळा पसरली. तेर येथे हळहळ व्यक्त करून बाजारपेठ बंद करण्यात आली. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार या अजित पवार यांच्या धर्मपत्नी. अजित पवार यांचे तेरवासीयांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकारणामध्येही माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजीतसिंह पाटील व अजित पवार यांची एकमेकांना साथ होती. दोन्ही कुटुंबांचे नातेसंबंध दृढ असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात धाराशिवची एक वेगळीच ओळख होती. अजित पवार यांनी अलीकडच्या काळात मराठवाड्यात चांगलाच जम बसविला होता. विशेष म्हणजे अजित पवारांनी मराठवाड्यातील राजकारणात नगर परिषद तसेच नगरपंचायत निवडणूक काळापासून अधिक रस घेण्यात सुरुवात देखील केली होती. मराठवाड्याच्या दौऱ्याप्रसंगी दिलेली वेळ व ठरलेली तारीख अजित दादांनी कधीही चुकविली नाही. त्यामुळे वेळ पाळणारा नेता असा अवेळी निघून जाईल, असे मराठवाड्याला कदापी वाटले नव्हते; परंतु शेवटी ईश्वराचा न्याय हा अन्याय करणाराच ठरला अशीच प्रतिक्रिया मराठवाड्यातून उमटत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानला मिरच्या का झोंबल्या?

आरिफ शेख, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक भारत-यूएई व्यापार कराराने पाकिस्तानला थेट इजा केली नाही; पण

आयपीओचे मृगजळ, गुंतवणूकदारांची लूट!

१६ जानेवारी २०२६ रोजी आपण ‘स्टार्टअप इंडिया’ची दहा गौरवशाली वर्षे पूर्ण केली. देशात दोन लाखांहून अधिक

जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय डावपेच

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा एकदा ग्रामीण भागात रंगू लागली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होत

कोणत्या रत्नांना गती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील तिसरा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

निवडणूक विदर्भात साहित्य संघाची

महाराष्ट्रात जिथे राजकीय निवडणुकांची चाहूल नाही, तिथे विदर्भात मात्र एका वेगळ्याच ‘निवडणुकीची’ धडधड सुरू झाली

विमानतळ बाजारपेठेला धुमारे

विमानतळांना विमान प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या महसुलातूनच उत्पन्न मिळत होते. विमान