नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने नाही तर तब्बल वर्षभर नाशिककरांना या वाहतूक कोंडीतूनच प्रवास करावा लागणार आहे. नाशिक शहरात एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामं सुरू असल्याने ही परिस्थिति निर्माण झाली आहे.
लवकरच नाशिक द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरच्या कामास सुरूवात होणार असल्याने ही वाहतूक कोंडी होणर आहे. तसेच इतर मार्गांवरची कामेही सुरू होणार असल्याने नाशिककरांना निदान वर्षभरतरी या वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्याची शक्यता कमीच आहे.
शहरात एकाचवेळी तब्बल ३० रस्त्यांची व ४ उड्डाणपुलांची विकास कामे, दुरुस्ती, आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यात द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू असेल. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेने पर्यायी मार्गांची सोय केली आहे.
पर्यायी मार्ग कोणते ?
द्वारका चौकात येणाऱ्या मोठ्या वाहनांसह एसटीबसेस, सिटी लिंक बसेसलाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरातून जाण्यासाठी या वाहनांना फेम थिएटर, पुढे बडाळागाव गाव कलानगर सिग्नल आणि पुढे पाथर्डी फाटा अथवा लेखानगरमार्गे मुंबई नाका असा पर्याय आहे. काही वाहनांना वडाळगावाजवळून साईनाथनगर चौफुली आणि पुढे इंदिरानगर अंडरपास व पुढे मुंबईनाका हा रस्ता देण्यात आला आहे. जाणाऱ्या वाहनांचा ताणही इंदिरानगर जॉगींग ट्रॅक रस्त्याने रवीशंकर मार्ग आणि डीजीपीनगर असा राहिल, जड अवजड वाहनांना दिवसभर शहराबाहेर रोखून धरण्याची व्यवस्था नसल्याने या वाहनांना बसेसबरोबर इंदिरानगर भागातूनच जावे लागेल.






