मुंबई : भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगर व शहर विभागमध्ये पाणीपुरवठा करणाऱया भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुमारे ४६ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यानंतर आता जलशुध्दीकरण प्रकल्प साकारला जात आहे.
भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. एप्रिल २०२९ पर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ३० जानेवारी २०२६ या जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रगतिचा आढावा घेतला. उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दररोज सुमारे २६०० दशलक्ष लीटर पाणी ...
मुंबईला होणा-या पाणीपुरवठ्याच्या मुख्यत: दोन प्रणाली आहेत. त्यापैकी एका प्रणालीतून तानसा - वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून गुरूत्वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते. भांडुप संकुलातील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येते. दररोज सुमारे २६०० दशलक्ष लीटर पाणी विविध ठिकाणी असलेल्या सेवा जलाशयांमार्फत मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येते.
आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित
भांडुप संकुलातील ७.४ हेक्टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्पस्थळास बॅरिकेडींग, वीजवाहक तारांच्या मनो-यांचे स्थलांतरण, वृक्षारोपण आदी कामांना वेग मिळाला आहे. स्थापत्य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीय कामे ही समांतरपणे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्यात येत आहे.
मुंबईकरांच्या पाण्याच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत
मुंबईकर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पाणीपुरवठा केवळ सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणापुरता मर्यादित नसून, तो आर्थिक विकास तसेच पर्यावरणीय स्थिरता यांना चालना देणारा आहे. मुंबई महानगराचा होणारा विकास, वाढती लोकसंख्या व नागरीकरणाचा विचार करता पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, बळकटीकरण व दीर्घकालीन शाश्वत व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब व सक्षम पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून, मुंबईकरांच्या पाण्याच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले.
जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती
भांडुप संकुल येथे उभारण्यात येत असलेल्या २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर मुंबई महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. मुंबईकर नागरिकांना अधिक दर्जेदार व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे . भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसेच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कार्यक्षम, पर्यावरणपूरक व दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात यावा, असेही निर्देश डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत.






