मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून गुरुवारी २९ जानेवारी २०२६ रोजी हटवण्यात आले.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, उप आयुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
अंधेरी (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग आणि गुलमोहर मार्गाला जोडून असलेल्या तसेच डॉ. रु. न. कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गाशी संलग्नित राम गणेश गडकरी मार्गावरील (इर्ला मार्ग) पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, कूपर रुग्णालयात अणीबाणीप्रसंगी रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱ्यांना पदपथांवरुन चालण्यास अडथळा निर्माण होत होता.
या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ प्रशासकीय विभागाकडून हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०३ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १०० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
या कारवाईबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत बांधकामांविरोधात नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.






