मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरु आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग परिसरातील पुनर्वसित इमारतींमधील घरांचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २०२६ च्या एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर घरांचा ताबा दिला जाणार आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या माध्यमातून या तीन ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३,६६६ सदनिका उभारण्याचे नियोजन असून, त्यापैकी सुमारे १,४०० हून अधिक घरे जवळपास पूर्ण झाली आहेत. यातील काही कुटुंबांना फेब्रुवारी अखेरीस घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरातील ८६४ घरे आणि वरळीतील ५७४ घरे बांधकामाच्या दृष्टीने तयार असून, त्यांना आवश्यक निवासी प्रमाणपत्रेही प्राप्त झाली आहेत. पूर्वी काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे वितरण प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून घरांचा ताबा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
वाटपाच्या वेळापत्रकानुसार, फेब्रुवारीमध्ये वरळी आणि नायगावमधील घरे वितरित केली जातील. त्यानंतर मार्चमध्ये वरळीतील आणखी घरे आणि एप्रिलमध्ये ना. म. जोशी मार्ग परिसरातील सदनिका रहिवाशांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे पहिल्या टप्प्यातील सर्व ३,६६६ कुटुंबांचे पुनर्वसन एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे.
वरळी
फेब्रुवारी ५७४ मार्च २८० एकूण १७०८
नायगाव
फेब्रुवारी ८६४ मार्च २३७
ना. म. जोशी मार्ग
एप्रिल ५७७
एकूण घरे - ३६६६
बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पात्र रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे आधुनिक सदनिका देण्यात येत आहेत. आधीच वरळीतील काही रहिवाशांना या नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, उर्वरित कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरांची वाट बघत आहेत.
मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बीडीडी पुनर्विकास प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यांतील इमारतींची कामे जसजशी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित रहिवाशांनाही नव्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे.






