मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात मृत्यु झाला.अजीत पवारांसह आणखी ४ जणांचाही या अपघातात मृत्यु झाला आहे.त्याच्यामधील एक फ्लाइट अटेंडंट मुंबई येथे राहणारी पिंकी माळी हिचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला.एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा तरडगाव येथे अंत्यसंस्कार झाले. दुसरीकडे, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिचं पार्थिव प्रथम सासरी कळवा येथे आणण्यात आलं. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी माहेरी वरळी येथे नेण्यात आले. पिंकी माळीच्या पार्थिवाला पाहताच तिच्या पती सोमकर यांना अश्रू अनावर झाले. पत्नीला अखेरचा निरोप देताना ते धाय मोकलून रडताना दिसले. अवघ्या तीन वर्षांपूर्वीच पिंकी आणि सोमकर यांनी संसाराची सुरुवात केली होती. आनंदी, उत्साही आणि मिळूनमिसळून राहणारं हे जोडपं सोसायटीत सर्वांच्याच परिचयाचं होतं. सण-उत्सव असो वा सामाजिक कार्यक्रम, दोघांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असायचा.
पिंकीच्या निधनाची बातमी समजताच माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले होते. वरळी येथे अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. साश्रू नयनांनी पिंकी माळीला अखेरचा निरोप देण्यात येणार असून या दुर्घटनेने अनेक कुटुंबांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.