तलासरी :महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी तालुक्यातील रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्यात तलासरी पोलिसांना मोठे यश आले आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या ३६ मिसिंग केसेसपैकी ३४ जणांचा शोध लावून पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे. तलासरी तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुली शेजारच्या गुजरात राज्यात कामासाठी जातात. कामाच्या ठिकाणी अनेकदा तरुण-तरुणी प्रेमात पडून घरच्यांना न सांगता निघून जातात. अशा परिस्थितीत हतबल झालेले कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये 'मिसिंग'ची तक्रार दाखल करतात.
या शोध मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. घर सोडून गेलेल्या व्यक्तींचा तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी अनेकांचे संसार आणि कुटुंब पुन्हा सावरले आहेत. तलासरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
३६ पैकी ३४ बेपत्ता व्यक्तींचा यशस्वी शोध
२०२५ मध्ये एकूण ३६ बेपत्ता तक्रारींची नोंद झाली होती. त्याचा सविस्तर तपशील : एकूण तक्रारी : ३६ यशस्वी शोध : ३४ महिला : २४ (तक्रारींपैकी बहुतांश शोधण्यात यश) पुरुष : १२ अपहृत मुले व मुली : ४ मुले आणि २ मुली (एकूण ६ जणांचा शोध घेऊन घरवापसी केली). प्रलंबित तपास : केवळ १ पुरुष आणि १ महिला यांचा शोध घेणे बाकी आहे.






