Thursday, January 29, 2026

चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तालुक्यात शिवसेना -भाजप युती, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना अशी तिरंगी लढत होणार आहे. जि.प. ९ जागांसाठी २८, तर पं. स. १८ जागांसाठी ५५ असे एकूण ८३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या योगेश खांडेकरांचा अपक्ष अर्ज राहिल्याने उमरोली गटात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उबाठा सेनेच्या तीन अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने शिरगांव, अलोरे गटात पक्षावर उमेदवारच नसल्याची नामुष्की ओढवली.

तालुक्यात एकूण २७ जागांसाठी भाजप १०, तर शिंदेसेना १८, राष्ट्रवादी सर्व २८, ठाकरे सेना २२ जागा लढवत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस अवघ्या एकेक जागा लढवत असून बसपा, वंचितनेही दोन उमेदवार उभे केले. या निवडणुकीत उबाठातर्फे तालुक्यातील मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात सर्वच ठिकाणी उमेदवार रिंगणात असले तरी चिपळूणच्या अर्ध्या भागात मात्र या पक्षाला सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच मंगळवारी शिरगांव गट आणि गण तसेच पिंपळी खुर्द गणातील तीनही अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पक्षाचा उमेदवारच राहिलेला नाही.

शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने कोकरे गटातून किशोर घाग, तर उमरोली गट भाजपला सोडला गेल्याने नाराज झालेल्या सेनेच्या योगेश खांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. मात्र घाग यांनी अर्ज मागे घेतला, तर खांडेकर रिंगणात कायम राहिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा