डॉ. देवीदास पोटे
जगी सर्वसुखी असा कोण आहे ?। विचारी मना तूचि शोधूनि पाहे ॥
'मनाचे श्लोक' हे समर्थाचे अतिशय लोकप्रिय असे काव्य आहे. मनाच्या श्लोकांना 'मनोबोध' किंवा 'मनाची शते' अशीही नावे आहेत. मनोबोधात एकूण दोनशे पाच श्लोक आहेत. भक्तिपंथ, जीवनमर्यादा, नामकरण, सदाचार, संतसंग, सद्गुरु अशा एकूण सत्तावीस विषयांवर विवेचन केलेले आहे. मनोबोधात व्यथा केलेले तत्वचिंतन त्यांच्या दासबोधास जवळचे आहे. माणसाचे मन हेच त्याच्या बंधनाचे किंवा मुक्तीचे कारण असते. मनाला सावध करण्यासाठी समर्थांनी ही मनाची शते लिहिली आहेत. ही मनाची शते म्हणजे एक वैचारिक प्रबंधच आहे. 'मना सज्जना' असे प्रेमाने आळवून समर्थ त्याला सौम्य शब्दात उपदेश करून जागृतीच्या मार्गावर आणतात. निंद्य ते सोडावे, वंद्य ते करावे, हे सांगताना नीती हे भक्ताचे अधिष्ठान आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. समर्थांचा पिंड एका प्रेमळ समाज शिक्षकाचा आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन' हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 'प्रभाते मनी राम चिंतित जावा' असा आरंभ करून समर्थांनी नामाचा महिमा विशद केला आहे. राघवाच्या गंगना समान रुपाचे चिंतन केले तर ईश्वरी कृपा होते आणि साक्षात्काराची अनुभूती येते. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, " रे मना, या जगात संपूर्ण सुखी कुणीच नसतो. म्हणूनच शोक आणि चिंता यांना दूर ठेवावे. शरीराच्या अस्तित्वाची जाणीव विसरून जावी. शरीराची आणि लौकिक आयुष्यातील दिसणाऱ्या वस्तूंची आसक्ती ठेवू नये. हा काळ प्रत्येकाच्या मागे येतच असतो. समर्थांनी आपल्या आयुष्यभर केलेल्या मनन आणि चिंतनातून आलेले रोख ठोक बोल त्यांच्या मनोबोधातून प्रकट झाले आहेत. म्हणूनच 'हे तो प्रचितीचे बोलणे आहे. समरसतेतील सौंदर्य आणि एकतानतेतील तेज घेऊन हे श्र्लोक जन्माला आले आहे. 'तळमळ तळमळ होताचे आहे, असे या कवित्वाचे कारण आहे. समर्थांप्रमाणे इतर अनेक संतांनी मनोबोधाचे महत्व सांगितले आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा॥ हे शाश्वत सत्य मनाला सांगते. मनोबोध हे विजय प्राप्त करण्याचे प्रभावी साधन आहे. समर्थांचे मनाचे 'श्र्लोक' ही सोन्याची तिजोरी आहे.





