Thursday, January 29, 2026

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ

शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ५० धावांनी विजय मिळवला. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा शून्यावर तर कर्णधार सूर्यकुमार यादव ८ धावांवर बाद झाला. केवळ १५ चेंडूंत अर्धशतक झळकावून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. हे टी-२० क्रिकेटमधील कोणत्याही भारतीयाचे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याने एकूण ६५ धावा (२३ चेंडू) केल्या, मात्र हर्षित राणाच्या शॉटवर गोलंदाजाचा हात लागून चेंडू स्टंपला लागल्याने तो दुर्दैवीरीत्या धावबाद झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि टीम सिफर्ट यांनी दणक्यात सुरुवात केली होती. दोघांनी आक्रमक खेळ केला. त्यांनी जवळपास १२ च्या धावगतीने धावा करताना १०० धावांची भागीदारीही केली. अखेर त्यांची धोकादायक ठरणारी भागीदारी ९ व्या षटकात कुलदीप यादवने तोडली. त्याने कॉनवेला रिंकू सिंगच्या हातून बाद केले. कॉनवेने २३ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्याच षटकात रचिन रवींद्र देखील २ धावांवर बाद झाला. तरी नंतर ग्लेन फिलिप्सने सिफर्टची साथ दिली. सिफर्टने अर्धशतकही पूर्ण केले. पण १३ व्या षटकात सिफर्टचा अडथळा अर्शदीप सिंगने दूर केला. त्याने रिंकू सिंगच्या हातून त्याला बाद केले. सिफर्टने ३६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर मात्र न्यूझीलंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.

आक्रमक खेळणाऱ्या फिलिप्सला १४ व्या षटकात कुलदीप यादवने बाद केले. तो १६ चेंडूंत २४ धावा करून रिंकू सिंगच्या हातून झेलबाद झाला. १६ व्या षटकात मार्क चॅपमनही ९ धावांवर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद झाला. झकारी फोक्सने आक्रमक सुरुवात केली. पण तोही १८ व्या षटकात १३ धावांवर बाद झाला. पण शेवटच्या दोन षटकांत डॅरिल मिशेलने आक्रमक खेळ केला आणि संघाला २० षटकात ७ बाद २१५ धावांपर्यंत पोहचवले. मिशेलने १८ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. मॅट हेन्रीने नाबाद ६ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा