मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना वेग आला असतानाच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी भूमिका त्यांनी गुरुवारी मांडली.
अजित पवार यांच्या निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार, नेतृत्व कोणाकडे जाणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का किंवा पक्षात अंतर्गत स्पर्धा वाढणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली. “सगळ्यांचीच मागणी आहे की वहिनींना मंत्रिपदी आणावे. ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून तसा निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार आहे,” असे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास ती अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, तसेच पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू राहील, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे?
- अजित पवार यांच्यासारखा सर्वमान्य आणि प्रभावी नेता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्याने पक्षाचे नेतृत्व कोणी करावे, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत नेतृत्वासाठी स्पर्धा होण्याची शक्यता असून, पवार कुटुंबातीलच कुणी पुढे येणार की पक्षातील अन्य वरिष्ठ नेते धुरा सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्या राज्याच्या सक्रिय राजकारणात परत येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याचबरोबर अजित पवार यांची मुले पार्थ आणि जय यांना भविष्यात पक्षाची जबाबदारी दिली जाणार का, यावरही चर्चा सुरू आहे.
- अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कोणता निर्णय घेतात आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला किती पाठिंबा मिळतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची भूमिका काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






