Friday, January 30, 2026

वांद्रे पूर्व स्कायवॉकची देखभाल, सुरक्षेत महापालिकेची कसोटी

वांद्रे पूर्व स्कायवॉकची देखभाल, सुरक्षेत महापालिकेची कसोटी

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाशेजारी नव्याने आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु या स्कायवॉकवर नव्याने फेरीवाला न बसणे आणि यावरील सरकते जिने यावर आसपासच्या वस्त्यांमधील मुलांची गर्दी होवू नये यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा राबवून तारेवरील कसरत करावी लागणार आहे . त्यामुळे या स्कायवॉकच्या देखभाल आणि सुरक्षेत महापालिकेची कसोटी लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते न्यायालय आणि म्हाडा कार्यालय याठिकाणी जाण्यासाठी आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम केले आहे. स्कायवॉकचे लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे या स्कायवॉकचे लोकार्पण झाल्यानंतर यावर एक फेरीवाल्यांनी त्वरीत आपली पथारी पसरवली होती. याबाबत एक्सवर पोस्ट झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदूल अंडे यांनी त्वरीत या फेरीवाल्यावर परवाना विभागाला निर्देश देत हटवले.

हे स्कायवॉक नागरिकांसाठी खुले झाल्याने आता रस्त्यावरुन जाणारे पादचारी आणि नागरिक हे आता याचा वापर करणार नाही. त्यामुळे स्कायवॉकवरूनच नागरिक तसेच नोकरदार मंडळी जाणार असल्याने रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करणारे फेरीवाले हे आपला व्यवसाय स्कायवॉकवर करण्याची दाट शक्यता आहे.विशेष म्हणजे स्कायवॉक नव्याने बनण्यात आल्याने आतापासूनच यावर आपली जागा अडवून तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे प्रथम एक आणि त्यानंतर दोन अशाप्रकारे एकेक करत ही संख्या वाढवली जावू शकते आणि यासाठी फेरीवाल्यांना टप्प्याटप्प्याने तिथे बसवले जाईल. त्यामुळे इथे बसवणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याला पहिल्या दिवसांपासून रोखल्यास हा स्कायवॉक फेरीवालामुक्त दिसून येईल.

त्यामुळे या स्कायवॉकवर आता फेरीवाल्यांचा डोळा असेल आणि नवीन जागा निर्माण झाल्याने त्यावर कब्जा करण्याचा विचार फेरीवाल्यांच्या म्होरक्यांचा असल्याने महापालिका प्रशासनाला यावर कायमच कारवाई करून तिथे त्यांना पथारी पसरवण्यास मज्जाव करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. तसेच या स्कायवॉकवर तिन सरकते जिने असल्याने येथील बेहराम पाडा तसेच आसपासच्या वस्त्यांमधील मुलांकडून खेळाकरता याचा वापर होवू शकतो. मुले यावर खेळू शकतात. त्यामुळे आसपासच्या वस्त्यांमधील मुलांकडून या सरकत्या जिन्याचा वापर खेळाकरता होवू नये तसेच या वस्त्यांमधील नागरिकांकडून याचा वापर निवारा म्हणून झोपण्याकरता होवू शकतो. त्यामुळे सुमारे १२५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पुलाच्या देखभाली आणि सुरक्षेसाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.

Comments
Add Comment