Thursday, January 29, 2026

महर्षी याज्ञवल्क्य

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की जो कोणी खरा ब्रह्मनिष्ठ असेल त्याने सोन्याने मढविलेल्या एक हजार गायी येथून घेऊन जाव्यात.

ही घोषणा ऐकून महर्षी याज्ञवल्क्य आपल्या शिष्याला म्हणाले, “सामश्रवा, या गायी आपल्या आश्रमात घेऊन जा’’ महर्षी याज्ञवल्क्यांचे हे बोल ऐकून तेथे जमलेल्या इतर विद्वानांनी त्यांना “कशावरून तुम्ही ब्रह्मनिष्ठ?’’ असे विचारले. त्यावर महर्षी याज्ञवल्क्यांनी “या सभेत जमलेल्या सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ ज्ञानीजनांनी माझी परीक्षा घ्यावी ’’ असे आवाहन केले. तेव्हा एकेका ज्ञानी ऋषिवरांनी अति विचारपूर्वक महर्षी याज्ञवल्क्यांना तत्त्वज्ञानातील गूढ प्रश्न विचारले. त्यावर महर्षी याज्ञवल्क्यांनी त्या प्रत्येक प्रश्नाचे असे समर्पक उत्तर दिले की, प्रश्नकर्त्याचे त्या उत्तराने पूर्ण समाधान झाले. हळूहळू सभेत जमलेल्या सर्व विद्वान ऋषीवरांना वाटू लागले की महर्षी याज्ञवल्क्यांनी असेच बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. त्यांच्या सर्वव्यापक, मूलगामी ज्ञानवैभवाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली होती. अखेर त्या सभेत असलेल्या थोर विदुषी गार्गी यांनी महर्षी याज्ञवल्क्य खरे ब्रह्मनिष्ठ असल्याचा निर्वाळा दिला.

महर्षी ब्रह्मरात आणि सुनंदादेवी यांच्या पोटी फाल्गुन शुद्ध पंचमीला याज्ञवल्क्यांचा जन्म झाला. याज्ञवल्क्यांचे पिता ब्रह्मरात निराधार जनांना सदैव अन्नदान करीत, म्हणून त्यांना वाजसेन असेही म्हणत. वडिलांच्या या उपनामावरून याज्ञवल्क्यांना वाजसेनीय याज्ञवल्क्य असे म्हणतात. व्रतबंधनानंतर याज्ञवल्क्यांना अध्ययनासाठी गुरुगृही महर्षी वैशंपायनांकडे म्हणजेच त्यांच्या मामांकडे पाठविण्यात आले. भगवान व्यासांनी वेदाचे वर्गीकरण केल्यावर याज्ञवल्क्यांचे गुरू महर्षी वैशंपायन यांच्याकडे यजुर्वेद सोपविला होता.

गुरुगृही आल्यावर याज्ञवल्क्यांनी महर्षी वैशंपायनांकडून संपूर्ण यजुर्वेद शीघ्र आत्मसात केला. याज्ञवल्क्यांची ज्ञानजिज्ञासा एवढी तीव्र होती की त्यांनी वैशंपायनांची अनुज्ञा घेऊन रोमहर्षणमुनींकडून इतिहास व पुराणांचे अध्ययन केले. महर्षी जैमिनींकडून सामवेदाचा संपूर्ण अभ्यास केला. उद्दालक आरुणींकडून मंत्रविद्या ग्रहण केली आणि हिरण्यनाथ ऋषींकडून याज्ञवल्क्य योगविद्येत पूर्ण पारंगत झाले. याज्ञवल्क्यांना आता ऋग्वेदाचे संपूर्ण अध्ययन करण्याची आंस लागली होती. म्हणून वैशंपायनांनी त्यांना शाकल्यमुनींकडे पाठवले. आज जशा वैद्यकीय, अभियांत्रिक, वाणिज्य, कला वगैरे विद्येच्या शाखा असतात, त्याचप्रमाणे याज्ञवल्क्यमहर्षींच्या काळी यजुर्वेद, ऋग्वेद, योग इ. विद्येची एकेक प्रचंड दालने होती. याज्ञवल्क्यांच्या चतुरस्र प्रज्ञेने या सर्व शाखांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले.

ऋग्वेदाच्या अध्ययनासाठी शाकल्यऋषींकडे याज्ञवल्क्य गेले असता शाकल्यऋषींची शिकविण्याची हातोटी आणि याज्ञवल्क्यांची ज्ञानग्रहणशक्ती या दोन्ही विलक्षण असल्याने अल्पकाळातच याज्ञवल्क्यांनी संपूर्ण ऋग्वेद आत्मसात केला. शाकल्यऋषींच्या आश्रमाला सुप्रिय नामक राजाचा आर्थिक आधार होता. त्या राजाकडे शाकल्यमुनी यज्ञात अभिमंत्रित केलेले तीर्थ पाठवीत. एकदा याज्ञवल्क्यांकडे ते तीर्थ राजाकडे घेऊन जाण्याचे काम आले. याज्ञवल्क्य राजमहाली पोचले तेव्हा राजा भोगविलासात मग्न होता. त्यामुळे राजाने ते तीर्थ उद्दामपणा करून स्वीकारले नाही. दिव्य मंत्रांनी अभिमंत्रित झालेल्या त्या तीर्थाचा अपमान याज्ञवल्क्यांना सहन झाला नाही. त्यांनी त्या तीर्थाला वंदन करून ते जवळच्या खांबावर टाकले आणि त्यानंतर याज्ञवल्क्य आश्रमाकडे निघून गेले. राजाने पाहिले की त्या तीर्थाचा स्पर्श होताच तो खांब पानाफुलांनी बहरून गेला होता. तीर्थ घेऊन येणाऱ्या याज्ञवल्क्यांची थोरवी राजाच्या लगेच ध्यानी आली. त्याने शाकल्यमुनींना विनंती केली की तुमच्या या शिष्यवराला माझ्याकडे पाठवा. शाकल्यमुनींनी याज्ञवल्क्यांना राजाकडे जाण्यास सांगितले पण याज्ञवल्क्यांनी मंत्रसिद्ध तीर्थाचा अपमान करणाऱ्या राजाकडे परत जाण्यास नकार दिला आणि आपण गुरुंच्या आज्ञेचे पालन करू शकत नाही म्हणून ते शाकल्यऋषीमुनींचा आश्रम सोडून परत वैशंपायनांच्या आश्रमात आले. वैशपायनमुनींना एकदा ब्रह्मवृंदांच्या सभेला जायचे होते, सभेला येण्यास विलंब करणाऱ्याला ब्रह्महत्येचे पातक लागणार, असे ब्रह्मवृंदात ठरले होते. सभेला जायला तयार होण्यासाठी वैशंपायनमुनी पहाट होण्यापूर्वीच उठले. त्यावेळी अंधारात त्यांचा पाय त्यांच्या बहिणीच्या नवजात अर्भकावर पडला. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत भ्रूणहत्या घडली शिवाय ब्रह्मसभेला जाण्यास उशीर झाल्याने ब्रह्महत्येचे पातकही घडले होते. याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांना काही वर्षांचा वनवास घ्यावा लागणार होता. पण त्यांच्या आश्रमातले अध्ययनसत्र पूर्ण झाले नसल्याने आपले हे पातक एखाद्या शिष्याने डोक्यावर घ्यावे, असे वैशंपायनमुनी आपल्या शिष्यांना म्हणाले. पण त्यासाठी कोणीही पुढे येईना, हे पाहिल्यावर याज्ञवल्क्यांनी “इतरांना विचारूच नका, मी एकटा हे पातक डोक्यावर घ्यायला तयार आहे” असे आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा याज्ञवल्क्याच्या या बोलण्यात अहंकार दडला आहे असे वैशंपायनांना वाटले आणि त्याबद्दल क्रोध येऊन त्यांनी याज्ञवल्क्यांना आपण दिलेली यजुर्वेदाची विद्या टाकून देऊन निघून जावे, असे सांगितले. त्यामुळे वैशंपायनांनी शिकविलेल्या यजुर्वेदाच्या विद्येचा त्याग करून याज्ञवल्क्य वैशंपायनमुनींच्या आश्रमातून बाहेर पडले. शाकल्यमुनींच्या आश्रमातून त्यांना असेच बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे याज्ञवल्क्यांच्या ध्यानीमनी नसता आपल्या विद्यामंदिरांचा त्याग करण्याचा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर दुसऱ्यांदा आला…!!

Comments
Add Comment