कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बारामतीत उपस्थित राहणार आहेत.
२९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. पवार कुंटुंबानी त्यांच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांनी अजित दादांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली आहे. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानला ठेवणार आहेत. सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. गुरुवारी सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी पार्थिव गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्याप्रतिष्ठानचा आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात अजित पवार यांची ओळख ‘लाडके दादा’ म्हणून होती. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो जनता बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळताच काही जण बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. बारामती शहरात शोकाकूल वातावरण तयार झाले असून, असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आहे.






