संतोष मोंडे राजापूर : राजापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारी 'मिनी मंत्रालये' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून,आता खरी चुरस गावकुसातील प्रचारात पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट संघर्ष पाहायला मिळत असून, विकासाचे मुद्दे आणि राजकीय वर्चस्व या भोवतीच ही निवडणूक फिरताना दिसत आहे.
राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणासाठी निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा गणांपैकी पाच गणात शिवसेना विरुद्ध उबाठा यांच्यात दुरंगी लढत होत आहे. तर कातळी गणात तिरंगी लढत होत आहे. मात्र बारा पंचायत समिती गणात सहा ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. तर सहा ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होताना पाहायला मिळत आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत राजापूर वगळता जिल्ह्यात महायुतीने सत्ता मिळविण्यात यश मिळविले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटातून प्रतीक मटकर (शिवसेना) विरूध्द राजेश चव्हाण (उबाठा) तर तळवडे गटातून सिद्धाली मोरे (शिवसेना) विरुद्ध समिक्षा चव्हाण (उबाठा) अशी दुरंगी लढत होत आहे. त्याचप्रमाणे जुवाठी गटातून रमेश सूद (शिवसेना) विरूध्द दिनेश जैतापकर (उबाठा) व धोपेश्वर गणातून प्रकाश कुवळेकर (शिवसेना) विरुद्ध अभिजीत तेली (उबाठा), तर साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना) विरुद्ध नलिनी शेलार (उबाठा) अशी चुरशीची लढत होत आहे. कातळी गटातून सोनाली ठुकरूल (शिवसेना) व लक्ष्मी शिवलकर (उबाठा), सावित्री कणेरी (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे.






