Thursday, January 29, 2026

वसई-विरारमध्ये दोन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व

वसई-विरारमध्ये दोन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व

विरार: वसई-विरार महापालिकेत सत्ता जरी बहुजन विकास आघाडीची राहणार असली तरी, नऊ प्रभाग समित्यांपैकी ए आणि डी या दोन प्रभाग समित्यांवर मात्र भाजपचे वर्चस्व रहाणार आहे. प्रभाग समिती बीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांच्या सदस्यांची संख्या ८ -८ अशी सारखी येत आहे. त्यामुळे या प्रभाग समितीत प्रभाग समिती सभापती हा ईश्वर चिठ्ठीतून निवडल्या जाण्याचे संकेत आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकूण नऊ प्रभाग समिती कार्यालय आहेत. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त हे प्रशासकीय प्रमुख असून, प्रभाग समिती सभापती हे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागाचे प्रमुख असतात. आणि त्या प्रभागातील सर्व नगरसेवक हे त्या समितीचे सदस्य असतात. नुकताच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ११५ सदस्य निवडून आले आहेत. प्रत्येक प्रभागाचा विचार केल्यास नऊ प्रभाग समित्यांपैकी सहा प्रभाग समित्यांवर संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचे सभापती राहणार आहेत. प्रभाग समिती सीमध्ये येणाऱ्या प्रभाग १, ३,४ आणि ७ मध्ये १६ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे या प्रभाग समितीवर बहुजन विकास आघाडीचे एक हाती वर्चस्व राहणार आहे. प्रभाग समिती ई मधील प्रभाग ११,१३ आणि १४ या प्रभागात एक काँग्रेस आणि ११ बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. या ठिकाणी सुद्धा प्रभाग सी प्रमाणेच परिस्थिती राहणार आहे. प्रभाग समिती एफ मध्ये प्रभाग ८ आणि १९ मध्ये बहुजन विकास आघाडीचे आठ आणि प्रभाग १८ मध्ये भाजपचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग समिती जी मधील २०,२१ आणि २७ प्रभागात बहुजन विकास आघाडीच्या अकरा नगरसेवकांमध्ये भाजपचे एकमेव सदस्य प्रभाग २१ मधून निवडून आल्याने ते एकच सदस्य विरोधक म्हणून या प्रभाग समितीत राहणार आहेत. प्रभाग समिती एच आणि प्रभाग आय मध्ये प्रत्येकी बाराही सदस्य बहुजन विकास आघाडीचेच आहेत. त्यामुळे या दोन समित्यांवर सुद्धा बहुजन विकास आघाडीचे "राज" चालणार आहे. प्रभाग समिती ए मध्ये प्रभाग २ आणि ५ येथे भारतीय जनता पक्षाचे आठ तर प्रभाग १२ मध्ये बहुजन विकास आघाडीचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे प्रभाग समिती सभापती बसणार आहेत. तसेच प्रभाग डी मध्ये येणाऱ्या १५,१७ आणि २२ या तीनही प्रभागात बाराही सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून आले असल्याने या प्रभाग समितीत पूर्णपणे भाजपचे वर्चस्व राहणार आहे.

एका प्रभागात नगरसेवक संख्येची 'टाय'

प्रभाग बी मध्ये समसमान सदस्य संख्या प्रभाग समिती बी मधील ६ आणि ९ या प्रभागात बहुजन विकास आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे सुद्धा आठ नगरसेवक या प्रभाग समितीत निवडून आले आहेत. प्रभाग १० आणि १६ मध्ये भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे या प्रभाग समितीचा सभापती निवडताना ईश्वरचिट्ठीचा उपयोग करावा लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment