विरार :वसई-विरार महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र नगरसचिव कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर याच दिवशी ३.३० वाजता या दोन्ही पदांसाठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर( मंगळवारी) ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून त्याच वेळी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यांनतर नामनिर्देशन पत्र मागे घेणे आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर लगेचच महापौर आणि उपमहापौर पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात येईल.
वसई - विरार महानगरपालिकेच्या नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर बविआचेच बसणार हे निश्चित आहे. मात्र या दोन्ही पदांवर कोणाला यावेळी संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. ११५ पैकी ७१ सदस्य त्यांचे निवडून आले असून त्यातील एका काँग्रेसच्या सदस्याला बविआचा पाठिंबा होता. तर भाजप-शिवसेना महायुतीचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकीच महापौर आणि उपमहापौर होणार आहेत. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील, प्रफुल साने, प्रशांत राऊत, डोमनिक रुमाव, आदी नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत.विशेष म्हणजे याआधी झालेल्या महापालिकेच्या दोनही निवडणुकीत बविआचेच वर्चस्व राहिले होते. महापालिकेचा कार्यकाळ २८ जून २०२० साली संपुष्टात आल्यानंतर मधील पाच वर्षात निवडणुका झाल्याच नाहीत. या दरम्यान प्रशासकीय काळ होता. मात्र आता नुकताच निवडणूक संपन्न झाल्यामुळे तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर महापालिकेला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. वसई - विरार महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण देखील नुकताच जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीमधील सर्वच ७१ सदस्य या पदासाठी दावेदार आहेत. तर दुसरीकडे भाजप सदस्य देखील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत दावेदार असून ते देखील अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी वसई विरारला अखेर महापौर मिळणार आहे. महापौर निवडीच्या आयोजित विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.






